बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सध्या मराठवाड्यातील राजकारण तापलं आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आंदोलन केले जात आहेत. त्यातच आता भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीनचिट दिली आहे. धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही. त्यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे” असे विधान भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री म्हणाले. यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मी संतोष देशमुख यांच्या हत्येला मी कधीही पाठिंबा दिलेला नाही, असे म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
नुकतंच भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याशी टीव्ही ९ मराठीने संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेल्या विधानाबद्दल सविस्तर भाष्य केले. धनंजय मुंडेंची अवस्था आणि त्यांची मानसिकता याला मी आधार दिला. मी त्यांना हे सांगितलं की माझा त्यांना पाठिंबा आहे. संतोष देशमुख यांची जी हत्या झाली, यात जे कोणी आरोपी आहेत, त्यांना फाशी व्हावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रयत्न करतात. यंत्रणा काम करते. न्यायालयीन व्यवस्था काम करतेय. यात नामदेव शास्त्री कुठे आहेत. मी कधीही हत्येला पाठिंबा दिलेला नाही. मी वारकरी आहे. आम्ही प्राणी मारत नाही. आम्ही शाकाहारी माणसं आहोत. माणूस मारल्यानंतर आम्ही त्याला पाठिंबा देऊ असे तुम्हाला का वाटतं? असा सवाल नामदेव शास्त्रींनी उपस्थित केला.
धनंजय मुंडेंची आई आणि बाबा हे भगवान बाबांचे शिष्य आहेत. परंपरेने ते भगवान बाबांचे भक्त आहेत आणि एखादा भक्त जर भगवान गडावर आला आणि त्याने जर आशीर्वाद दिला तर त्याचे राजकारण करण्याइतपत कोती बुद्धी महाराष्ट्राची नसावी असे मला वाटते, असेही नामदेव शास्त्री म्हणाले.
धनंजय मुंडे हे जेव्हा भगवान गडावर आले तेव्हा त्यांच्या हाताला सलाईनची सुई होती. त्यांना गडावर आल्यावर सलाईन लावलेली होती. ज्या माणसाचा चेहरा ५३ दिवसांपासून खराब झालेला आहे, त्याच्या हाताला सुई आहे, रक्त येतं, तरीदेखील एखाद्या संताने आशीर्वाद द्यायचा नाही ही कुठली वृत्ती आहे. हत्येचा आणि पाठिंब्याचा विषय वेगवेगळा आहे. ते भगवान गड मोठा करतात. हत्येला किंवा आरोपीला पाठिंबा दिला असता तर तुमचं म्हणणं बरोबर होतं, असेही नामदेव शास्त्रींनी सांगितले.