Sambhal violence : संभल येथे न्यायालयाच्या आदेशानुसार जामा मशिदीत सर्वेक्षणासाठी पथक आल्याचे कळताच संतप्त जमाव येथील वाहनांची जाळपोळ केली.
Published on
:
25 Nov 2024, 7:07 am
Updated on
:
25 Nov 2024, 7:07 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील संभल येथे न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात येणार्या सर्व्हेदरम्यान रविवारी (दि.२४) झालेल्या हिंसाचारातील मृतांची संख्या चार झाली आहे. (Sambhal violence) लोकसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विरोधी पक्षांनी मशिदीच्या सर्वेक्षणाद्वारे हिंसा भडकावल्याचा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान, या हिंसाचार प्रकरणी समाजवादी पार्टीचे खासदार झियाउर रहमान बारक यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सपाच्या खासदारावर गुन्हा दाखल
संभल हिंसाचार प्रकरणी समाजवादी पार्टीचे नेते व संभलचे खासदार झियाउर रहमान बारक, आमदार इक्बाल मेहमूद यांचा मुलगा सोहेल इक्बाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंसाचार घडवून आणणे, जमाव जमवणे आणि अशांतता निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान दगडफेक, हिंसाचार
संभल येथे न्यायालयाच्या आदेशानुसार जामा मशिदीत सर्वेक्षणासाठी पथक आल्याचे कळताच हजारोचा संतप्त जमाव मशिदीभोवती एकत्रित आला. पथकावर आणि पोलिसांबर दगडफेक सुरू केली. परिसरातील इमारतीच्या छतांवरून पोलिसांवर गोळीबार करण्यात आला, असे पोलिस आयुक्त अंजनेय सिंह यांनी सांगितले. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, लाठीमार केला. यामुळे पळापळ व चेंगराचेंगरी झाली. या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर आज (दि. २५) उपचार सुरु असताना एका जखमीचा मृत्यू झाला.
पोलिस अधीक्षकांसह १५ पोलीस कर्मचारी जखमी
या हिंसाचारात पोलिस अधीक्षक विष्णोई, पोलिस अधिकारी अनुज चौधरी यांच्यासह १५ अन्य पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. संतप्त जमावाने शासकीय वाहनांची जाळपोळ केली. पोलिसांचे प्रत्येक आवाहन जमावाने भुडकावून लावले. पोलिसांना मारहाण सुरू केली. अखेर पोलिसांना पळ काढावा लागला. अनेक पोलिस या हल्ल्यात जखमी झाले. नंतर कुमक आली. लाठीमार सुरू केला. मग जमाबाची पळापळ सुरू झाली. तो पांगल्यानंतर या भागात चप्पल-जोडघांबा खच पडलेला होता. समाजवादी पक्षाचे खासदार बर्क यांचा रहिवासही याच परिसरात आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून आहेत. तणाव असल्याने शहरात पोलिस बंदोबस्तही बाढवला आहे. कुणालाही सोडणार नाही. जमावाला भडकवणाऱ्यांना जन्माची अद्दल घडवू, असे पोलिस अधीक्षक विष्णोई यांनी सांगितले.
पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
हिंसाचारातील मृतांची नावे नईम अहमद, बिलाल अंसारी आणि नोमान अशी असून, मृतांच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याबाबत कुठलेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.