Published on
:
21 Jan 2025, 1:35 am
Updated on
:
21 Jan 2025, 1:35 am
वास्को : कुठ्ठाळी-सांकवाळ मार्गावर सोमवारी पहाटे 5 च्या सुमारास दोन कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत कार चालकासह दोघांचा मृत्यू झाला. कार चालक सुरेश जग्गल (वय 45) हे जागीच ठार झाले. त्यातील दुसरा प्रवासी निस्सार अहमद (54, बंगलोर) याच्यावर इस्पितळात उपचार चालू असताना मृत्यू झाला. दुसरा कार चालक यल्लाप्पा मुनिस्वामी (30, कळंगुट) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या 125 (ब), 281, 106 (1) नुसार गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवेवाडे-वास्को येथे राहणारा सुरेश जग्गल हा निस्सार अहमदसह आपल्या कारने सोमवारी पहाटे 5 च्या सुमारास कुठ्ठाळीहून सांकवाळमार्गे वास्कोकडे येत होता. त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार चुकीच्या मार्गाने जाऊन समोरून येणार्या दुसर्या कारला धडकली. या धडकेत सुरेश जग्गल याचा जागीच मृत्यू झाला. तर निस्सार अहमद व दुसरा कारचालक मुनिस्वामी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तथापी तेथे उपचारादरम्यान निस्सार याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वेर्णा पोलिस उपनिरीक्षक राजदत्त आर्सेकर पुढील तपास करीत आहेत.