सांगली : मालमत्ता (घरपट्टी) कराच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. सन 2002-03 मधील दरानुसार आकारणी केलेली आहे. घरपट्टीच्या एकूण रकमेत काही वाढ झाली असल्यास त्याला बांधकाम क्षेत्रफळातील वाढ, बांधकाम प्रकार बदल, वापरातील बदल ही कारणे आहेत. भाडे इमारतीच्या घरपट्टीबाबत दोन महिन्यात सकारात्मक निर्णय होईल. सर्व मालमत्ताधारकांना समन्यायी पद्धतीने आकारणी होईल, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशमुख म्हणाले, सन 2002-03 मधील कराच्या दरानुसार कर आकारणी केलेली आहे. मालमत्ता कराच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. मालमत्ता सर्वेक्षण केले असता बांधकाम क्षेत्रफळात वाढ, बांधकाम प्रकारातील बदल, वापरातील बदल, ज्या मालमत्तांबाबत झाला आहे, त्यांना आधीच्या घरपट्टीपेक्षा वाढ झाली आहे.
मोजमापात बदल किंवा चूक असल्याची हरकत नोंदवली असल्यास मालमत्तेची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून फेरमोजणी करण्यात येईल. फरक आढळल्यास मोजमाप योग्य करून कर आकारणी दुरुस्त करण्यात येईल. वापराच्या प्रकाराबाबत हरकत असेल तर स्थळ पाहणी केली जाईल. त्यानुसार बदल करण्यात येईल. हरकतीनुसार प्रत्यक्ष पाहणी करून बांधकामाचा प्रकार तपासला जाईल. त्यानुसार योग्य ती दुरुस्ती करण्यात येईल. बांधकाम परवाना व इतर कागदपत्रे तपासून बांधकाम वर्ष दुरुस्ती केली जाईल, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
भाडेकरू नाही, चुकीचे भाडे
मालमत्तेवर भाडेकरूप्रमाणे केलेली आकारणी मान्य नसल्याबाबतच्या हरकतीवर देशमुख म्हणाले, मालमत्ता सर्वेक्षण करताना मालमत्तेत भाडेकरू आढळून आला. त्यामुळे भाडेकरूप्रमाणे आकारणी केलेली आहे. हरकतीनुसार पुन्हा तपासणी करण्यात येईल. सर्वेक्षण करताना करारनामा न मिळाल्यामुळे भाडेकरूने सांगितलेल्या भाड्यानुसार आकारणी करण्यात आली आहे. मालत्ताधारकाने भाडेकरारपत्र सादर केल्यावर त्याप्रमाणे आकारणी करण्यात येईल. स्वत: मालक असताना भाड्याने आकारणी केल्याची हरकत असल्यास स्थळ पाहणी करून योग्य ते भाडेमूल्य निश्चित केले जाईल.
सर्वेक्षणावेळी मालमत्ता बंद असल्यामुळे अथवा आतून मोजणी करण्यास नकार दिल्यामुळे मालमत्ता बाहेरून मोजणी करण्यात आली. आलेल्या हरकतीप्रमाणे पुन्हा अंतर्गत मोजणी करण्यात येईल व सुधारित कर आकारला जाईल. नाव चुकीचे असल्यास कागदपत्रांची तपासणी करून नाव दुरुस्त करण्यात येईल, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
माजी सैनिकांना मालमत्ता करात सूट आहे. माजी सैनिक असल्याबाबतचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कागदपत्र दाखवल्यास मालमत्ताधारक माजी सैनिक, शहीद सैनिकाच्या पत्नीस मालमत्ता करात सवलत दिली जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.
खुला भूखंड, पार्किंगला कर
खुल्या भूखंडावर मालमत्ता कर आकारणी का केली, असे आक्षेप आहेत. त्यावर देशमुख म्हणाले, शहरातील इमारती व जमिनीवर महापालिका अधिनियमानुसार कर आकारणी केलेली आहे. मालमत्ता करातून कोणतीही मालमत्ता वगळता येत नाही. पार्किंग जागेला खुल्या भूखंडापेक्षा जास्त कर आहे, मात्र खुल्या भूखंडाइतका कर लावला आहे. घराच्या आत पार्किंग शेडला वाणिज्य आकारणी केली असल्यास पुन्हा सर्वेक्षण करून आकारणी सुधारित केली जाईल. चालू बांधकामावर आकारणीबाबतच्या हरकतीवर देशमुख म्हणाले, स्थळ पाहणी करून निर्णय घेण्यात येईल.