Published on
:
31 Jan 2025, 12:59 am
Updated on
:
31 Jan 2025, 12:59 am
पलूस : किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशननजीक रामानंदनगर येथील बापूवाडी झोपडपट्टी हटवण्याच्या प्रयत्नांना नागरिकांच्या तीव्र विरोधाचा सामना रेल्वे प्रशासनाला करावा लागला. पलूस न्यायालयाने 1 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिल्यानंतरही रेल्वे प्रशासनाने हटवादी भूमिका घेतली होती, मात्र नागरिकांच्या आंदोलनामुळे अखेर प्रशासनाला माघार घ्यावी लागली.
सत्तर वर्षांपासून येथे इराणी व डवरी समाज वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनी झोपडपट्टीतील घरे वाचवण्यासाठी एकजूट दाखवत संघर्ष केला. प्रशासनाच्या कारवाईविरोधात झालेल्या जोरदार आंदोलनानंतर रेल्वे अधिकार्यांनी मागे हटण्याचा निर्णय घेतला.किर्लोस्करवाडी एलसी गेट 112 येथील रहिवाशांना पूर्वी अनेकदा रेल्वेच्या मालकीच्या जागेत अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. ती काढून घेऊन रेल्वेच्या मालकीची जागा मोकळी करून देण्यात यावी, यासाठी वारंवार रेल्वे प्रशासनातर्फे तोंडी व लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले होते. परंतु आजतागायत कोणत्याही प्रकारची दखल येथील रहिवाशांनी घेतली नाही. 29 जानेवारी 2025 पूर्वी आपली मालमत्ता काढून घ्या व रेल्वेच्या मालकीची जागा मोकळी करा, अन्यथा रेल्वे प्रशासनतर्फे अतिक्रमण करून बांधलेली घरे पाडली जातील, अशी नोटीस रेल्वे प्रशासनाने संबंधितांना बजावली होती.
त्याअनुषंगाने रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलिस व स्थानिक पलूस पोलिस ताफा सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जमा झाला. यावेळी रेल्वे प्रशासन व झोपडपट्टीधारक यांच्यात संघर्ष चालू झाला. झोपडपट्टी धारकांच्यावतीने डॉ. अमोल बुचडे यांनी पलूस न्यायालयाने 1 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिल्याचे सांगितले. तसेच न्यायालयीन बाजू रेल्वे प्रशासनासमोर मांडली. परंतु दिलेली स्थगिती ही योग्य नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. यावेळी झोपडपट्टी न हटवण्याचा निर्णय झाला असला तरी पुनर्वसनाशिवाय हटवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
सध्या झोपडपट्टी ही रामानंदनगर गावच्या हद्दीत असून ती पूर्णतः रेल्वेच्या जागेत नाही. जोपर्यंत रेल्वे प्रशासन नवीन आराखडा करून त्यांची रेल्वे हद्द निश्चित करत नाही. तोपर्यंत आम्ही जागा सोडू शकत नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रवीष्ट असल्याचे भाजपाचे अमीर पठाण यांनी सांगितले. यावेळी किर्लोस्कर कामगार युनियनचे अध्यक्ष शिवाजीराव मगर पाटील यांनी लक्ष घालत न्यायालयाचा अवमान करू नका व 1 तारखेपर्यंत न्यायालयाची वाट पाहा त्यानंतर योग्य ती कारवाई करा असे रेल्वे प्रशासनाला सांगितले. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून पुणे येथील अधिकार्यांशी सल्लामसलत करून ही कारवाई थांबवण्यात आली. यावेळी रेल्वे असिस्टंट सेक्युरिटी कमिशनर पुणे प्रबीर कुमार दास, किर्लोस्करवाडी रेल्वे पोलिस ठाणे पीआय महेंद्र पाल, पलूस सहायक पोलिस निरीक्षक सुशांत पाटील, पीआय महेंद्र गायकवाडसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.