साने गुरुजींचे साहित्य नैतिक मूल्यांचा जागर:राष्ट्रभक्तीचे आगर अन् समतेचा सागर होय, डॉ. सतीश तराळ यांचे प्रतिपादन
2 hours ago
1
‘महात्मा गांधींची सत्यनिष्ठा, रवींद्रनाथ टागोर यांची सौंदर्यनिष्ठा व विनोबांची सांस्कृतिक निष्ठा साने गुरुजींच्या व्यक्तिमत्वात होती. त्यांचे साहित्य म्हणजे नैतिक मुल्यांचा जागर, राष्ट्रभक्तीचे आगर व समतेचा सागर होय. ते मातृमूर्ती, मातृहृदयी महाकवी, माधुर्याचे महामेरू व मानवतेची महान माता होते,’अशा आशयाचे उद्गार डॉ. सतीश तराळ यांनी काढले. साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या समारोपात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. भारतीय महाविद्यालय येथे झालेला हा समारंभ राष्ट्रसेवा दल, आंतरभारती, शिक्षक भारती, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा, साने गुरुजी कथामाला या संघटनांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य राजाभाऊ महाजन होते. तर पाहुणे म्हणून भारतीय विद्या मंदिरचे सचिव अनंत सोमवंशी व शेंदूरजनाघाट येथील अब्दुल शकील, राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळराव कोरडे व समितीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. काशिनाथ बऱ्हाटे उपस्थित होते. समितीतर्फे या उपक्रमांतर्गत मागील वर्षभरापासून जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयांमधून विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यातील सत्तरहून अधिक शाळा महाविद्यालयाने सक्रिय भाग घेतला. डॉ. सतीश तराळ पुढे म्हणाले जन्मदात्री माता, भारतमाता व जगद् माता या मातृतत्रयीचे मंगल स्तोत्र म्हणजे साने गुरुजींचे साहित्य होय. सर्वसमावेशक मातृत्वाची भावना हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व वाङ्मयाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. विशाल व्यापक व अपवादभूत मातृत्वाचा प्रेमळ आविष्कार म्हणजे साने गुरुजी होते. त्यांना लोकमातृत्व प्राप्त झाले होते. ज्ञानेश्वराप्रमाणे त्यांनाही माऊली संबोधले जाते. विनोबा त्यांना संत तुकारामाच्या जात कुळीचा आधुनिक संत व अमृतपुत्र संबोधतात. ते बालसाहित्याचे दीपस्तंभ होते. मानवतेवर प्रेम करणारे महान ऋषी होते. त्यांचे साहित्य पावित्र्य, मांगल्याने ओथंबलेले आहे. प्रास्ताविक आयोजन समितीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. काशिनाथ बऱ्हाटे यांनी केले. त्यांनी समितीतर्फे वर्षभर आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली व साने गुरुजी यांच्या जीवन कार्याची वैशिष्ट्ये सांगितली. पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप राऊत व प्रा मनोज सपकाळ यांनी केले. आभार प्रा. भारत कल्याणकर यांनी मानले. यावेळी वर्षभर आयोजन समितीतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गीत गायन स्पर्धा इत्यादी स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या शाळांना, सहभागी शिक्षकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. शांताराम चव्हाण, संदीप तडस, प्रा. डॉ. अलका गायकवाड, मायाताई वाकोडे, गायत्री आडे तसेच राष्ट्र सेवा दल, अ. भा. समाजवादी शिक्षण हक्क सभा, साने गुरुजी कथामाला, आंतरभारती, शिक्षक भारती, जाणीव प्रतिष्ठान व आम्ही भारतीय सांस्कृतिक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. साने गुरुजींचे इतर पैलू ते महान गांधीवादी ललित लेखक होते. मातृभक्त व मातृभूमी भक्त होते. त्यांची कविता आत्मनिष्ठ नसून समाजनिष्ठ व राष्ट्रनिष्ठ आहे. ते प्रचंड प्रबोधन मूल्य व संस्कार मूल्य असलेले लेखक नव्हे तर शैलीकार होते. प्रेम भावनेचा विशाल, व्यापक आविष्कार त्यांच्या साहित्यात आढळतो. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हाच त्यांच्या जीवनाचा व साहित्याचा आत्मा आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)