Published on
:
20 Nov 2024, 3:27 pm
Updated on
:
20 Nov 2024, 3:27 pm
सिल्लोड : शहरातील नॅशनल उर्दू हायस्कुलच्या मतदान केंद्रावर बोगस मतदानावरुन ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुरेश बनकर यांना शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. यानंतर दोन्हीं गटात राडा झाला. ही घटना सायंकाळी पाच सुमारास घडली.
ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुरेश बनकर शहरातील मतदान केंद्रांना भेटी देताना हा प्रकार घडला. नॅशनल उर्दू हायस्कुलच्या मतदान केंद्राला भेट देत असताना बोगस मतदान केले जात होते. याबाबत अधिका-यांना विचारणा करीत असताना शिंदे गटाचे दोन कार्यकर्ते बनकर यांच्या अंगावर धावून गेले. यातून हा वाद उद्धभवल्याचे कळते. या घटनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच ग्रामीण भागातून बनकर समर्थक मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले. शहरातील डॉ. आंबेडकर चौकात सत्तार- बनकर यांचे कार्यालय समोरा- समोर असून दोन्ही कार्यालयात कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने शहरात तणावाचे वातावरण आहे. तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
तालुक्यातील घटांब्री येथेही मंत्री सत्तारांच्या शाळेवरील शिक्षक गावात आल्याने ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धारेवर धरले. यानंतर शिक्षक गावातून निघून गेल्याने शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी शिक्षकाला का काढले म्हणून जाब विचारला व पुन्हा दोन गटात राडा झाला. अजिंठा पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना बाजूला करीत वाद मिटवला व मतदान सुरळीत सुरु केले. दरम्यान या प्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी दिली.