Published on
:
22 Nov 2024, 7:14 am
Updated on
:
22 Nov 2024, 7:14 am
बाळंतपणासाठी अनेकजणी माहेरी जातात. विशेषतः, पहिल्या बाळंतपणासाठी तरी मुली आपल्या आईच्या घरी हमखास जातात. या खेडेगावातून त्या खेडेगावात, गावातून शहरात, एका शहरातून दुसर्या शहरात, एका राज्यातून दुसर्या राज्यात आणि काही वेळा एका देशातून दुसर्या देशात. तशा आसपासच्या जवळपास सर्व मुली, बायका बाळंतपणासाठी माहेरी जाताना मालतीने पाहिल्या होत्या; पण ती मात्र माहेरी गेली नाही. कारण तिला ‘माहेर’ असं मुळी नव्हतंच.
लहानपणी आई गेली. प्रेमळ आईचा आधार तुटल्यावर वडिलांनी जीवापाड माया लावून मालतीला वाढवलं. पण तिचं बाळंतपण, त्यातही पहिलंवहिलं, ते कसं निभावून नेणार? मग या सार्या पार्श्वभूमीवर मालतीच्या सासूबाईंनी ठरवलं, ‘आपल्या सुनेचं बाळंतपण आपणच करायचं. अगदी तिच्या आईने केलं असतं तसं!’ सासूबाई चार बुकं शिकलेल्या. श्रद्धाळू पण अंधश्रद्धा मुळीच नाही. उपासतापास, व्रतवैकल्यं, अंगारेधुपारे, नवस-साकडं-प्रसाद असल्या कशा कशावर म्हणून त्यांची भिस्त नाही.
गरोदरपणात डॉक्टरांचा सल्ला मालती मानते आहे ना आणि ती नीट सकस अन्न खाते आहे ना यावर त्यांची प्रेमळ नजर असायची. सासूबाई आपल्यासाठी एवढं सगळं करतायत हे अनुभवताना मालतीला कधी कधी फार कसनुसं होऊन जायचं. ती म्हणायचीसुद्धा - ‘सासूबाई का करता इतकं सगळं माझ्यासाठी?’ त्यावर सासूबाई नुसतं हसायच्या आणि म्हणायच्या, ‘अगं मुलगीच आहेस तू माझी. लेक सुखरूप असावी असं कुठल्या आईला नाही वाटणार? आईच्या मायेने करण्याचा फक्त प्रयत्न करतेय मी, बस्स!
आता विचार करा - अगदी आईच्या मायेने सुनेचं करणार्या, तिला माया लावणार्या, तिला काय हवं नको बघणार्या किती सासूबाई असतात? सुनेला कामाला जुंपणार्या, सासुरवास करणार्या किती असतात? आता तसं पाहिलं तर कुठलीही सासू आपल्या सुनेला किमान माणुसकीने वागवू शकतेच की! अगदी मालतीच्या सासूप्रमाणे माया लावणं सोडा; पण आपल्या सुनेवर ताण येणार नाही, तिचं जगणं मुश्कील होणार नाही, ती आनंदी राहील हे तरी नक्की पाहू शकते. पण असं कितपत घडतं, हा खरंच विचार करण्याजोगा मुद्दा आहे. आपल्या मुलाला व नातवंडांना मायेची वागणूक आणि सुनेला दुय्यम, कठोर, परकेपणाची वागणूक असं कधी कधी काही स्त्रियांकडून का होतं? या दुजाभावाच्या संदर्भाने आपण आपल्या आजूबाजूला पाहायला हवं. डोळसपणे नात्यांमध्ये डोकवायला हवं. भूमिका सुनेची असो किंवा सासूची, काही चुकतमाकत असेल तर सुधारायला हवं.