Published on
:
21 Jan 2025, 1:33 am
Updated on
:
21 Jan 2025, 1:33 am
कोल्हापूर ः सोन्यावरील सीमा शुल्कात कपात केली, तर मागणी वाढते आणि परकीय चलनातील तूटही वाढते. याउलट सीमा शुल्कात वाढ केली, तर बाजारात भाववाढ झाल्यामुळे सोन्याची तस्करी वाढून सरकारचा कर बुडतो. अशा एका विचित्र कात्रीत सध्या भारतीय अर्थमंत्रालय सापडले आहे. यामुळे तस्करांविरुद्ध कडक उपाययोजना करून सोन्यावरील सीमाशुल्क वाढविले, तर किमान परकीय व्यवहारातील तूट कमी करता येईल. या विचारावर केंद्रीय अर्थमंत्रालयात गांभीर्याने विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नव्या अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमा शुल्कात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असून सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढतील, असा अंदाज आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी संसदेत 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. तो सादर करताना त्यांच्यासमोर वित्तीय आणि परकीय चलनातील तूट कमी करण्याचे आव्हान आहे. विशेषतः देशाची आयात वाढून निर्यातीत घट झाल्यामुळे त्यांना परकीय चलनातील तूट कमी करण्यावर अधिक लक्ष द्यावे लागत आहे. परकीय चलनातील तुटीला देशात सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात जबाबदार ठरत आहे.
गेल्या काही वर्षांत सोन्याचे देशांतर्गत बाजारातील भाव वाढत चालल्याने तस्करीच्या रुपाने देशात सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात होत होती. त्याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने 23 जुलै 2024 रोजी सोन्यावरील सीमा शुल्कात 15 टक्क्यांवरून 6 टक्क्यांपर्यंत कपात केली. यामुळे सोन्याची आयात वाढली. या आयातीने ऑगस्ट 2024 मध्येच 104 टक्के वाढ नोंदविली. याचे एकत्रित मूल्य सुमारे 10 हजार अब्ज डॉलर इतके होते. पण, याच कालावधीत भारतातून निर्यात होणार्या जडजवाहिरांच्या दागिन्यांच्या निर्यातीत सुमारे 23 टक्क्यांची म्हणजे सुमारे 2 हजार कोटी डॉलरची घट झाली. सोन्याच्या आयातीसोबत क्रूडऑईलच्या आयातीवर होणारा खर्चही सध्या सरकारची डोकेदुखी आहे. यामुळेच आयात-निर्यातीमधील तफावतीची दरी रुंदावत आहे. क्रूड ऑईलच्या आयातीवर खर्ची पडणार्या परकीय चलनाचा बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकार इथेनॉलसह बायोफ्युएलच्या निर्मितीला प्रोत्साहन देत आहे, पण सोन्यावरील सीमाशुल्कात कपात केल्याने देशांतर्गत सोन्याचा वापर वाढून सरकारवरील परकीय चलनाचा ताण मात्र कायम राहत आहे.
दर 90 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता
गतवर्षी केंद्र सरकारने सोन्यावरील सीमा शुल्कात 15 टक्क्यांवरून 6 टक्क्यांपर्यंत कपात करण्यापूर्वी बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 74 हजार रुपयांवर होता. शुल्कात कपात होताच हा दर 67 हजार 500 रुपयांपर्यंत खाली आला. तथापि, या दरात मात्र सोने ग्राहकाला मिळाले नाही. ते उपलब्ध नाही, या सबबीखाली व्यापारी पेढ्यांनी दर दाबून ठेवला. प्रसंगी सोन्याच्या दरावर प्रीमियम घेऊन सोने विकले जात होते. सोमवारी (20 जानेवारी) बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 81 हजार रुपयांवर पोहोचला आहे. यामध्ये सोन्याच्या सीमा शुल्कात वाढ झाली, तर सोने 90 हजारांच्या उंबरठ्याला स्पर्श करू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.