चिखली येथील तपासणी नाक्यावर तब्बल ८९.७८ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. Pudhari Photo
Published on
:
17 Nov 2024, 9:56 am
Updated on
:
17 Nov 2024, 9:56 am
आडगाव रंजे : पुढारी वृत्तसेवा : परभणी ते वसमत मार्गावर चिखली येथील तपासणी नाक्यावर रविवारी (दि.१७) सकाळी आठ वाजता एका खाजगी बसची तपासणी केली. यावेळी एक प्रवाशी घाबरला. त्यामुळे शंका आल्याने तेथे असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी बसमधील सर्वच बॅगची तपासणी केल्यानंतर ३ सॅकमधून तब्बल ८९.७८ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर पोलिस विभागाने तसेच महसूल प्रशासनाने तपासणी नाके उभे केले आहेत. या नाक्यावर वाहनांची तपासणी केली जात असून अधिकाऱ्यांच्या सरप्राईज भेटीमुळे त्या ठिकाणी कर्मचारीही सतर्क झाले आहेत. उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी, हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पथके स्थापन केली आहेत.
दरम्यान, रविवारी सकाळी आठच्या सुमारास या ठिकाणी स्थिर पथकाचे गंगाप्रसाद गायकवाड, सुरज शामशेटेवार, पोलिस कर्मचारी महेश गर्जे, डोखोरे, सुमेध कांबळे, पवन झंझाड यांच्यासह सीमा सुरक्षा बलाचे चार जवान कार्यरत होते. यावेळी मुंबईकडून नांदेडकडे जाणारी खासगी बस थांबवून तपासणी केली जात होती. पोलिस कर्मचारी गर्जे व डाखोरे बसमध्ये चढल्यानंतर एक प्रवाशी घाबरलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यामुळे शंका आल्याने त्यांनी बसमधील सर्वच बॅगची तपासणी सुरु केली.
यामध्ये तीन प्रवाशांकडे असलेल्या सॅक बॅगमध्ये मोठ्या प्रमाणावर नोटांचे बंडल असल्याचे दिसून आले. यावेळी पथकाने तीन बॅग ताब्यात घेऊन तीन प्रवाशांनाही सोबत घेतले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार शारदा दळवी, हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांनी तपासणी नाक्यावर धाव घेतली.
दरम्यान, या ठिकाणी सापडलेल्या तीन बॅगमधील रोकड मोजण्यासाठी मशीन आणले होते. मात्र, काही वेळातच मशीन बिघडल्यामुळे दुसरे मशीन आणण्यात आले आहे. रोकड मोजणीसाठी तब्बल दोन तासांचा कालावधी लागला आहे. यामध्ये ८९ लाख ७८ हजार रुपयांची रक्कम असल्याचे स्पष्ट झाले आहे. रक्कमेसह तीन जणांना वसमत येथे नेले असून त्या ठिकाणी चौकशी केली जात आहे.