हिंगोली : सारंगवाडी येथील सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर file photo
Published on
:
20 Jan 2025, 4:15 pm
Updated on
:
20 Jan 2025, 4:15 pm
औंढा नागनाथ : तालुक्यातील सारंगवाडी येथे थेट जनतेतून प्रभू लिंग शिवाचार्य महाराज यांची इतर मागासवर्गीय प्रवर्गातून सरपंच म्हणून निवड झाली होती. परंतु नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी तहसील कार्यालयात अविश्वास ठराव दाखल करून आज झालेल्या विशेष बैठकीमध्ये सरपंचाच्याविरुद्ध नऊच्या नऊ सदस्यांनी मतदान करून अविश्वास ठराव मंजूर करून एक नवीन पायंडा पुढे आणला आहे.
औंढा नागनाथ येथील तहसीलदार हरीश गाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम विकास अधिकारी गंगाधर हलबुर्गे , लिपीक कुळकर्णी यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये थेट जनतेतून निवडलेल्या सरपंच शिवाचार्य महाराज यांच्या विरुद्ध सर्वच्या सर्व नऊ सदस्यांनी मतदान करून अविश्वास ठराव मंजूर केला, कांतराव ठोंबरे यांनी या अविश्वास ठरावासाठी विशेष मार्गदर्शन आणि पुढाकार घेऊन अविश्वास ठराव मंजूर केला . परंतु थेट जनतेतून निवडलेल्या सरपंचावर ग्रामपंचायत सदस्य अविश्वास ठराव आणू शकतात का हा प्रश्न अनुत्तरीत असून ग्रामपंचायत अधिनियमानुसार आता तहसीलदार समस्त मतदारातून ग्रामसभा बोलवून सरपंचावर अविश्वास ठरावासाठी मतदान घेणार काय याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.