राज्यातील 288 विधानसभेच्या जागेसाठी बुधवारी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचारासाठी आता अवघे 36 तास उरले आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. रविवार आणि सोमवार असे अवघे दोन दिवस उरले असल्याने उमेदवारांनी सभा, रॅली, बैठकांवर जोर दिला असून प्रचार करताना त्यांची दमछाक होत आहे. उमेदवारांना निवडणुकीचा प्रचार सोमवारी, 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता थांबवावा लागणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर 4 नोव्हेंबरपासून प्रचाराला सुरुवात झाली होती. सध्या उमेदवारांच्या जाहीर सभा, रॅली, कॉर्नर बैठका, गावभेटींवर जोर दिला जात आहे, परंतु आता मतदानासाठी केवळ तीन दिवस उरले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी मुदत ही मतदान संपायच्या 48 तासांपर्यंत असते. त्यामुळे जाहीर प्रचार 18 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता संपणार आहे. प्रचार संपल्यानंतर उमेदवारांना राजकीय सभा, रॅली, बैठका घेता येणार नाहीत.
रविवार ठरणार खास
उद्या, रविवारी सुट्टी असल्याने राजकीय नेत्यांसाठी हा दिवस प्रचारासाठी खास ठरणार आहे. मतदानाआधी येणारा 17 नोव्हेंबरचा रविवार उमेदवारांसाठी खास असणार आहे. सुट्टीचा मुहूर्त साधण्यासाठी उमेदवारांकडून सभा, रॅली, बैठकांवर जोर दिला जाणार आहे. सुट्टीच्या दिवशी घरी असलेल्या जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांचा कस लागणार आहे.
कुटुंब रमले प्रचारात
मतदारसंघातील संपूर्ण मतदारांपर्यंत पोहोचण्याचे सर्वात मोठे आव्हान उमेदवारांसमोर आहे. निवडणुकीला कमी वेळ मिळाल्याने अनेक उमेदवारांची धावपळ पाहायला मिळत आहे. जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचता यावे यासाठी उमेदवारांसोबत त्यांचे कुटुंबही प्रचारात रमल्याचे दिसत आहे. उमेदवार आणि त्यांचे कुटुंब शहर आणि ग्रामीण भागात पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. उमेदवार तर मार्ंनग वॉकमध्ये मतदारांशी संवाद साधताना दिसत आहेत.