मोनेगिरी – चार मामा

5 days ago 2

>> संजय मोने

प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या कला क्षेत्राची जाणीव करून देणारी ही व्यक्तिमत्त्वं… संपूर्ण कला क्षेत्रात ‘मामा’ अशा आदरार्थी संबोधनाने ओळखल्या जाणाऱया या माणसांकडून बरंच काही शिकण्यासारखं होतं आणि आहे.

लेखाच्या शीर्षकावरून वाचकांना असं वाटेल की, मी माझ्या नात्यातल्या चार मामांबद्दल लिहिणार आहे. त्यामुळे आधीच स्पष्ट करतो की यातले एकही मामा माझे नात्याने मामा नव्हते, तरीही आमचं एक वेगळं नातं होतं आणि ते नातं आमच्या अभिनयाच्या किंवा इतर कलांच्या अंगाशी निगडित होतं. या चार मामांपैकी दोन आता हयात नाहीत आणि दोन अजून अगणित वर्षं कार्यरत राहावेत असं मला मनापासून वाटतं. या चार मामांपैकी तीन मामांना मी भेटलो आहे. त्यांच्याशी संवादही साधला आहे. ते माझे मित्रही होते. अर्थात मित्र असं म्हणतो तेव्हा त्यांनी मला आपलंसं केलं, यात माझं कर्तृत्व शून्य आहे (कर्तृत्व हा शब्द जरा नीट छापावा, कारण त्या शब्दाचं आता वेगळंच रूप बोललं जातं आणि छापून येतं). त्यातले पहिले मामा म्हणजे कै. मामा पेंडसे. यांना मी खूप लहानपणी ‘बेबंदशाही’ नाटकात अभिनय करताना पाहिलं होतं. अभिनयाबद्दल काहीही न कळण्याच्या काळात. माझ्या वडिलांबरोबर त्यांनी एका नाटकात काम केलं होतं. त्यांच्याबद्दल बोलताना माझे वडील कायम कानाच्या पाळ्यांना हात लावून बोलायचे.

बऱ्याच वर्षांपूर्वी दादरला एका रंगमंचावर केशवशास्त्राr नावाच्या एका नाटकातल्या खलप्रवृत्तीच्या पात्राबद्दल बोलण्यासाठी ‘आविष्कार’च्या मंचावर काही लोकांना पाचारण केलं गेलं होतं. त्यात कै. मामा पेंडसे होते, शिवाय नवीन काही दिग्दर्शक होते. त्या सगळ्यांना केशवशास्त्राr या पात्राबद्दल, त्यांचं काय मत आहे आणि त्यांनी त्या व्यक्तिरेखेचा काय विचार केला आहे यावर एक निबंधवजा लेख लिहायला सांगितलं होता. (हल्ली त्याला पेपर म्हणतात). मामा पेंडसे यांनी त्यांचा निबंध वाचला आणि त्यानंतर एक स्वगत सादर केलं. पूर्णपणे गौरवर्ण, भेदक नजर आणि उत्कृष्ट संवाद यातून त्यांनी त्या केशवशास्त्राr या पात्राचे अंतरंग उलगडून दाखवले होते. उरलेल्या सगळ्यांपेक्षा ते अवर्णनीय होतं. त्यानंतर त्यांचे जावई कै.जयंत सावरकर यांच्याबरोबर 3 नाटकं आणि 4 मालिकांत मी एकत्र काम केलं होतं. तेव्हा कै. मामा पेंडसे ह्यांच्याबद्दल खूप ऐकायला मिळालं. नाटकात काम करणारा आणि निर्व्यसनी कलाकार, त्यातून आपल्या तब्येतीबद्दल जागरूक आणि त्याही पलीकडे जाऊन कुटुंबाची काळजी घेणारा कलाकार म्हणजे तीन शिंगांची गाय. नेमस्तपणे ते आयुष्यभर जगले. त्यांनी निबंध वाचला तेव्हा लक्षात राहिला होता जो आजही आहे आणि तो म्हणजे वाक्य उच्चारताना ओठातून बाहेर पडणारा स्वच्छ आणि कंठील स्वर.

दुसरे मामा म्हणजे कै. प्राध्यापक मधुकर तोरडमल. अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक. या तीनही पातळीवर अत्युत्कृष्ट कामगिरी. विनोदी नाटकापासून ते थरारनाटय़ यापर्यंत दर्जेदार लेखन. इंग्रजीचे प्राध्यापक असल्यामुळे त्या भाषेवर कमालीची हुकूमत. देशी-विदेशी नाटकांची आणि त्यातल्या अनेक कलाकारांबद्दल त्यांच्या गुण आणि दोषासकट पूर्ण, म्हणजे अभ्यासपूर्ण तपासून घेतलेली माहिती. त्यांच्याबरोबर मी ‘लग्नाची बेडी’ नावाच्या नाटकात अभिनय करायचा प्रयत्न केला होता. बाहेरगावी प्रयोग संपला की सर्व सामान वगैरे आवरून निघेपर्यंत आम्हाला साधारण तास-दीड तास वेळ मिळायचा. इतर नाटकांत तो फक्त टिंगल-टवाळी करण्यात आम्ही व्यतीत करायचो. पण मामांच्या सोबत गप्पा रंगायच्या. त्यांना जरा बोलतं केलं की ते असंख्य कलावंतांचे अभिनयाचे बारकावे समजावून सांगायचे. आमच्यातले काही कलाकार काही वेळ ऐकून निघून जायचे, पण मी ऐकत बसायचो, प्रश्न विचारायचो. ते मला कायम ‘दिलीपकुमार’ अशी हाक मारायचे आणि मी त्यांना ‘ओलीविये’ म्हणायचो. नाटकाचे प्रयोग संपल्यानंतरही आमचा स्नेह कायम राहिला. माझ्या मते ते सर्वोत्तम कलाकार होते. कारण तुम्ही जर मुळात तडकाफडकी स्वभावाचे असाल, तर तुम्हाला तशा व्यक्तिरेखा सादर करायला मिळाल्या तर त्या रसिकांना आवडतात. पण तुमच्या स्वभावाच्या विरोधातल्या भूमिका करताना तुम्हाला थोडा अधिक सायास पडतो. मामांच्या बाबतीत हे गणित खोटं ठरतं. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ नाटकात वेंधळा प्रा. बारटक्के बघताना आपल्याला वाटतं की हा माणूस वैयक्तिक आयुष्यात असाच असला पाहिजे. मग तुम्ही ‘गुड बाय डॉक्टर’मधील व्यक्तिरेखा बघता आणि वाटतं की हा माणूस अत्यंत क्रूर असला पाहिजे. त्यांच्याकडून त्यांनी आम्हाला खूप शिकवायचा प्रयत्न केला. आम्ही काय शिकलो देव जाणे! पण ज्याअर्थी शेवटपर्यंत ते फोन करून ‘दिलीपकुमार… या एकदा जेवायला’ म्हणायचे त्या अर्थी आम्ही त्यांच्या खिजगणतीत होतो, हेच आमचे भाग्य!

तिसरा माझा मामा म्हणजे प्रदीपमामा मुळे. तसा वयाने फार मोठ्ठा नाही. पण नेपथ्यकार म्हणून खूप खूप मोठ्ठा. आम्ही एक नाटक करत होतो. त्या नाटकात मामा मुळे यांनी एका गराजचा सेट केला होता. आमच्यातला एक कलाकार गाडी घेऊन तालमीच्या ठिकाणी आला आणि गाडी अचानक बंद पडली. ड्रायव्हरने नाटकाचं नेपथ्य बघितलं आणि तो गाडी दुरुस्त इथेच होईल म्हणू लागला. खूप प्रयत्न केल्यावर त्याच्या लक्षात आलं की, हे खरंखुरं गराज नाही. याहून नेपथ्याला वेगळी पावती काय मिळायला हवी? मामा मुळेने अनेक नाटकाचं नेपथ्य केलं. त्याच्या ‘प्रपोजल’ नाटकात एका रेल्वेच्या बोगीचा सेट होता. ते बघायला प्रेक्षक यायचे. मला वाटतं नेपथ्य बघायला पुनःपुन्हा प्रेक्षक येणारा हल्लीच्या काळातला तो एकमेव सेट. आता मुळेमामा पुणे येथे राहतात. त्याबद्दलची आख्यायिका अशी आहे की, त्याला नेपथ्य, प्रकाशयोजना आणि वेशभूषा यांची इतकी पारितोषिकं मिळाली की मुंबईच्या घरातली जागा अपुरी पडायला लागली म्हणून मोठ्ठी जागा हवी म्हणून तो तिथे राहायला गेलाय. डेक्कन क्वीन जशी रोज मुंबई-पुणे किंवा पुणे-मुंबई असा प्रवास करते तसा मुळेमामाही प्रवास करत असतो. त्याच्या नेपथ्याला खास ‘मुळेमामा’ स्पर्श असतो. आता त्याचे नेपथ्य असलेल्या नाटकांची यादी करायची झाली तर हा लेख अजून तीन पंधरवडे तरी लिहीत बसायला लागेल.

आता चौथे मामा म्हणजे अशोकमामा सराफ. त्यांना मामा का म्हणतात हा प्रश्नच आहे. कारण त्यांचे मामा गोपीनाथ सावकार यांच्या नाटकातून ते रंगभूमीवर अवतीर्ण झाले. माझा त्यांचा संबंध दोन चित्रपट आणि दोन नाटकं इतका आहे. त्यांची शिस्त, प्रयोग असतो तेव्हा त्यांचे स्वतचे एक वेळापत्रक असते आणि त्यानुसार ते असंख्य प्रयोग करत आले आहेत. माझ्या वयाचे अनेक मित्र त्यांना ‘अरे अशोक’ अशी हाक मारतात, पण मला ती हिंमत आजतागायत झाली नाही आणि होऊ नये. उत्कृष्ट सहकलाकार, हुकमी हास्य परिपोष आणि नाटकाचा आधारस्तंभ अशीच त्यांची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर आहे.

एक नाटक मी लिहिलं होतं, 32-33 वर्षांपूर्वी. त्यात ते प्रमुख भूमिकेत होते. कुठल्या तरी नाटकातल्या एका विनोदी प्रसंगाबद्दल त्यांनी मला बोलावून त्यात काय म्हणायचं आहे याची चौकशी केली. मी त्यांना म्हणालो, तुम्हाला काय बदल करायचा तो करा. त्यावर ते म्हणाले, लेखक संपूर्ण नाटकाचा विचार करून लिहितो. मी अशोक सराफ आहे म्हणून त्यात बदल करणार नाही. मी अवाक् झालो, कारण बरेचदा तथाकथित विनोदी कलाकार संहिता अशी काय स्वतला वाटते तशी बदलतात की तालीम बघायला आलेल्या लेखकाला हे आपण लिहिलेलंच नाटक आहे का, असा प्रश्न पडतो.

तर हे चार मामा, ज्यांनी मला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या कला क्षेत्राची जाणीव करून दिली त्याबद्दल मी त्यांचा शतश ऋणी आहे. असे माझे चार मामा!

[email protected]

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article