23-24 जानेवारीला बालकुमार साहित्य संमेलन:सूर्यकांत सराफ अध्यक्षपदी, बालसाहित्यिक ग. ह. पाटील यांच्या जन्मगावी आयोजन
6 hours ago
1
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त चाळकवाडी-पिंपळवंडी, नारायणगाव येथे दोन दिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध बालसाहित्यिक ग. ह. पाटील यांच्या जन्मगावी होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ बालसाहित्यिक सूर्यकांत सराफ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. 23 जानेवारीला दुपारी 3 वाजता आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलन नगरीला 'ग. ह. पाटील बालसाहित्य नगरी' असे नाव देण्यात आले असून, मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी आणि त्यांना नामवंत बालसाहित्यिकांशी संवाद साधता यावा या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. 24 जानेवारीला सकाळी 9 वाजता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. यानंतर 'बालसाहित्याची सद्य:स्थिती' या विषयावर परिसंवाद, 'मनोरंजनातून बालसाहित्य' या विषयावर विशेष सत्र आणि शालेय विद्यार्थ्यांचे कविसंमेलन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीकांत पाटील, अनिल कुलकर्णी, जालिंदर डोंगरे, एकनाथ आव्हाड यांसारखे नामवंत साहित्यिक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या पुरस्कृत या संमेलनात स्थानिक लोकप्रतिनिधी, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. चौथ्या सत्रात दुपारी 2:30 वाजता ‘कथा पंचक’ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांचे कथावाचन होणार असून बालसाहित्यिक डॉ. विनोद सिनकर (छत्रपती संभाजीनगर) अध्यक्षस्थानी असणार आहेत. दुपारी 3:30 वाजता आयोजित पाचव्या सत्रात संजय ऐलवाड (पुणे), बालकृष्ण बाचल (पुणे) आणि उत्तम सदाकाळ (जुन्नर) ‘कथाकथन’ सादर करणार असून रमेश तांबे (मुंबई) अध्यक्षस्थानी असणार आहेत. सायंकाळी 4:30 वाजता प्रसिद्ध बालसाहित्य समीक्षक डॉ. विद्या सुर्वे-बोरसे (नाशिक) यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)