Published on
:
18 Jan 2025, 5:43 pm
Updated on
:
18 Jan 2025, 5:43 pm
धुळे : दमन मधून बनावट दारूची तस्करी होत असल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने हाणून पाडला. विशेष म्हणजे दारू तस्करांनी जनरेटरमध्ये लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य दारू तस्कराच्या शोधासाठी आता पोलीस सक्रिय झाले आहेत.
धुळ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना दीव दमण येथून दारूची मोठ्या प्रमाणे तस्करी होणार असून एका गाडीमध्ये ठेवलेल्या जनरेटरच्या आडून ही तस्करी होत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी पोलीस पथकाला तातडीने या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश करून महामार्गावर सापळा लावला.
त्यानुसार पथकाने सुरत बायपास रोडवरील खान्देश कॅन्सर सेंटर समोरील महामार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत असताना संबंधित वाहनातील चालक विकाससिंग नगेंद्रसिंग चौहान (रा. धर्मेशभाईकी चाळ, दमण) याच्याकडे विचारपुस केली असता, त्याने पॉवर जनरेटर गुजरात राज्यात घेवून जात असल्याचे सांगून दिशाभूल करणारी माहिती दिली. मात्र बारकाईने जनरेटरची तपासणी केली असता आतील पोकळ भागात विविध कंपनीची विदेशी दारु व बिअर बाटल्या मिळून आल्या. यात एकुण 4 लाख 17 हजार किंमतीची विदेशी दारु आणि 12 लाख किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, असई संजय पाटील, पोहेकॉ. पंकज खैरमोडे, पवन गवळी, आरीफ पठाण, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, पोकों. मयुर पाटील, सुशिल शेंडे, राहुल गिरी, हर्षल चौधरी यांनी केली आहे.