शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कारला आज दुपारी खेड गल्ली येथे बेस्ट बसने धडक दिली. मात्र आमदार शिंदे काही क्षणांपूर्वीच कारमधून उतरले असल्याने ते थोडक्यात बचावले. मात्र अपघातात शिंदे यांच्या गाडीचे नुकसान झाले.
गेले काही दिवस बेस्ट बस अपघाताचे प्रमाण वाढले असून प्रवाशांसह पादचाऱयांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. शिवसेना आमदार सुनील शिंदे प्रभादेवी शिवसेना शाखा क्रमांक 194 येथे हे पक्षाच्या कार्यक्रमासाठी जात होते. रस्त्यालगत गाडी थांबवल्यानंतर मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आलेली बेस्टची बस मार्ग क्रमांक 151 ही बस वडाळा आगार ते जे. मेहता मार्ग अशी जात होती. खेड गल्ली येथे दुपारी सव्वाबाराच्या सुमारास बेस्ट बसने समोरून आमदार सुनील शिंदे यांच्या गाडीला धडक दिली. या अपघाताची माहिती दादर पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी चालकासह सविस्तर माहिती घेत या अपघाताची नोंद केली.
बेस्ट बसने दिलेल्या धडकेत परमेश्वराच्या कृपेने कोणीही जखमी झालेले नाही. गाडीचे मात्र नुकसान झाले. लोकांना अपघाताबाबत माहिती मिळताच अनेकांनी फोनद्वारे विचारपूस केली. मात्र काळजी करण्यासारखे कारण नाही. – सुनील शिंदे, आमदार शिवसेना