हॉलतिकिटात घुसवलेली जात हद्दपार:दहावी-बारावीच्या प्रवेशपत्रात नोंद केल्याने टीकेची झोड

3 hours ago 2
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये हाेणाऱ्या दहावी-बारावी परीक्षांच्या प्रवेशपत्रांवर (हाॅलतिकिीट) यंदा प्रथमच जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. जातीपातीच्या वादातून आधीच महाराष्ट्रात वातावरण तापलेले असताना बोर्डाच्या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे. राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मात्र विद्यार्थ्यांच्या हितासाठीच हा निर्णय घेतल्याचे सांगत समर्थन केले आहे. आम्ही जातीचा उल्लेख केला नसून फक्त प्रवर्गाची नोंद केल्याची मखलाशीही त्यांनी केली. पण, विद्यार्थ्याच्या टीसीवर जातीची नोंद असताना मग पुन्हा हॉलतिकिटावर हा खटाटोप कशासाठी, असा सवाल पालक व शिक्षणतज्ज्ञ करत आहेत. त्यामुळे रात्री एक परिपत्रक काढून बोर्डाने हाॅलतिकिटावरील प्रवर्ग नोंदी रद्द करून नव्याने हॉलतिकीट देणार असल्याचे जाहीर केले. जिथे रोल नंबरवर स्टिकर तिथे प्रवर्ग तरी कशाला? बोर्डाने हॉलतिकिटावर जात प्रवर्गाचा केलेला उल्लेख अत्यंत चुकीचा आहे. आपण परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची ओळख लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांची ओळख परीक्षकालाही कळू नये यासाठी रोल नंबरवरही आपण स्टिकर लावतो. त्यामुळे बोर्डाने हॉलतिकिटावर जात प्रवर्गाचा केलेला उल्लेख न पटणारा आहे. विशेषतः या निर्णयाखातर दिलेले स्पष्टीकरणही न पटणारे आहे. एकवेळ जातीचा उल्लेख निकालावर केला असता तर ते चालले असते, पण शाळेच्या दाखल्यावर जात असताना पुन्हा हॉलतिकिटावर त्याचा उल्लेख करणे योग्य नाही. - हेरंब कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ. जातीचा नाही, तर केवळ प्रवर्गाचा उल्लेख केला जातीचा प्रवर्ग तेथे टाकावा. कुठल्याही जातीचा उल्लेख करायचा नाही. केवळ एससी, एसटी, अोबीसी असा प्रवर्ग असेल. भविष्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्यासाठी सोयीचे व्हावे, त्यांना विविध शिष्यवृत्ती अन् शुल्क माफीसह इतर योजनांचा लाभ देण्यासाठी डाटा शिक्षण विभागाकडे असावा हाच उद्देश आहे. त्यात कुठेही जातीचा उल्लेख करू नये, असेच आदेश मी राज्य शिक्षण मंडळाला दिले आहेत. - दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री बारावीचे नवे हॉलतिकीट २३ पासून, दहावीचे २० जानेवारीला मिळणार दिवसभर आपल्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या राज्य शिक्षण मंडळाला सायंकाळी मात्र उपरती आली. राज्य शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांच्या सहीने एक पत्रक जारी करण्यात आले आहेे. त्यात म्हटले आहे की, ‘बोर्डातर्फे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली जात प्रवर्गाचा उल्लेख असलेली प्रवेशपत्रे (हॉलतिकीट) रद्द करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना आता २३ जानेवारीपासून नव्याने तयार केलेली हॉलतिकिटे राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेण्यासाठी दिली जाणार आहेत. तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विभागीय मंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेली प्रवेशपत्रे जात प्रवर्गाचा उल्लेख असल्यामुळे तीसुद्धा रद्द केली आहेत. विद्यार्थ्यांना ही प्रवेशपत्रे राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून २० जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपासून डाऊनलोड करून घेता येतील, असे बोर्डातर्फे जाहीर करण्यात आले आहे. शाळेत कोणती जात नोंदवण्यात आलीय याची माहिती पालकांनाही व्हावी म्हणून हॉलतिकिटावर जातीचा उल्लेख केला. शालेय शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी गेला की प्रवर्गात बदल करता येत नाही. त्यामुळे जर शाळेतच चुकीची नोंद झाली असल्यास पालकांना योग्य ती कागदपत्रे सादर करून दुरुस्ती करता यावी हा या उल्लेखामागील हेतू आहे. त्यामुळे या निर्णयाचा वेगळा अर्थ काढू नये. - शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य शालेय शिक्षण मंडळ, पुणे

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article