दूषित पाण्यामुळे नागरिकांना आजारांचा ‘ताप’File Photo
Published on
:
19 Jan 2025, 4:32 am
Updated on
:
19 Jan 2025, 4:32 am
खडकवासला: महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या धायरी, किरकटवाडी, नांदोशी, खडकवासला परिसरात काही ठिकाणी गाळमिश्रित दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे लहान मुलांसह नागरिकांना उलट्या, अतिसार, गॅस्ट्रो आदी साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे परिसरातील दवाखान्यांमध्ये नागरिकांची उपचारासाठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महापालिका प्रशासन पाण्याचे शुद्धीकरण करून पाणीपुरवठा करीत असल्याचा दावा करीत आहे. मात्र, या गावांमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प नसल्याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. या गावांमध्ये ग्रामपंचायत काळातील जलवाहिन्यांतून पाणीपुरवठा होत आहे.
या जलवाहिन्या जीर्ण झाल्याने त्यांच्यात दूषित पाणी मिसळत असून तेच परिसरातील नागरिकांना प्यावे लागत आहे. खडकवासला धरणाखालील परिसरामधील रहिवाशांना अपुरा आणि दूषित पाणीपुरवठा होत आहे. धायरी येथील डीएसके गृहप्रकल्प, रायकर मळा, गावठाण, महादेवनगर, पोकळेनगर तसेच नांदोशी, किरकटवाडी आदी ठिकाणी महिनाभरापासून गढूळ पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे धायरीचे माजी उपसरपंच संदीप चव्हाण, किरकटवाडीचे सुभाष हगवणे यांनी लक्ष वेधले आहे.
सुभाष हगवणे म्हणाले, महापालिका केवळ नागरिकांकडून कराची वसुली करीत असून, मूलभूत सुविधा पुरविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी; अन्यथा नागरिकांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
सिंहगड रोड पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता अक्षय गावित, पर्यवेक्षक, अधिकारी, कर्मचार्यांना पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी दिवस-रात्र धावपळ करावी लागत आहे. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नर्हे, धायरी आदी ठिकाणची पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडली असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे. जुन्या जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्यासाठी प्रशासनाने निधी उपलब्ध करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
परिसरातील दूषित पाण्यामुळे उलट्या, अतिसार, गॅस्ट्रो आदी आजारांनी नागरिक आजारी पडत आहेत. या गावांचा महापालिकेत समावेश होऊन 7 वर्षे झाली तरीही अद्याप एकाही गावात प्रशासनाने जलशुद्धीकरण प्रकल्पाची सुविधा उपलब्ध केली नाही. ग्रामपंचायत काळातील जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांतून सध्या पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांना दूषित पाणी मिळत आहे.
- संदीप चव्हाण, माजी उपसरपंच, धायरी
पाणी शुद्धीकरण यंत्रणा नसल्याने टाकीतील पाण्यात टिसेल पावडर टाकून निर्जंतुकीकरण केले जात आहे. त्यानंतरच पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी गढूळ असले तरी ते पिण्यासाठी योग्य आहे.
- जांबुवंत कांबळे, पर्यवेक्षक, सिंहगड रस्ता पाणीपुरवठा विभाग