उत्तरेकडून येणार्या वार्यांची दिशा बदलली; थंडी गायबFile Photo
Published on
:
19 Jan 2025, 1:57 am
Updated on
:
19 Jan 2025, 1:57 am
Weather Update Today: उत्तर भारत गारठलेला असताना महाराष्ट्रात थंडी नाही. कारण, उत्तरेकडून येणार्या वार्यांची दिशा बदलली आहे. महाराष्ट्रात हे वारे येणे बंद झाले, तसेच बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे राज्यात येत आहेत. त्यामुळे जानेवारी महिन्यातदेखील राज्यात उबदार वातावरण असून, किमान तापमानात दुपटीने वाढ झालेली दिसत आहे.
गेले तीस दिवस उत्तर भारत थंडीने गारठलेला आहे. महाराष्ट्रात मात्र यंदा डिसेंबरमधील मोजकेच दिवस थंडी जाणवली. मात्र, जानेवारीत कडाक्याच्या थंडीचा अंदाज असताना बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला अन् राज्यातील बहुतांश भागांत ढगाळ वातावरण आणि पाऊस असे वातावरण होते.
त्यामुळे किमान तापमानात दुपटीने वाढ झाल्याने राज्यात दिवसा कडक ऊन आणि पहाटे गारठा, असे विचित्र हवामान तयार होऊन सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले. अजूनही हे वातावरण बदलायला तयार नाही. कारण, उत्तरेकडून येणार्या वार्यांची दिशा पूर्वेकडे वळली आहे. त्यामुळे हे वारे महाराष्ट्रात येणे बंद झाले. त्याचा परिणाम म्हणून किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे.
उत्तर भारतात दाट धुके अन् थंडी
येत्या दोन ते तीन दिवसांत 21 जानेवारीपासून नवा पश्चिमी चक्रवात तयार होत आहे. त्यामुळे हिमालयात बर्फवृष्टी होऊन काही भागांत पाऊस पडेल. त्यामुळे उत्तर भारत पुन्हा काडाक्याच्या थंडीने गारठणार आहे, असा इशारा हवामान विभागाने शनिवारी दिला.
राज्याचे शनिवारचे किमान तापमान
अहिल्यानगर 12.5, पुणे 13.1, जळगाव 13.5, कोल्हापूर 18.6, महाबळेश्वर 13.4, मालेगाव 15.2, नाशिक 14.6, सांगली 19.6, सातारा 16.3, सोलापूर 16.9, छ. संभाजीनगर 14, परभणी 13.4, अकोला 14.8, अमरावती 15.3, बुलडाणा 14.8, ब्रह्मपुरी 13.9, गोंदिया 14.4, नागपूर 14, वर्धा 14.6, मुंबई 21.7.
उत्तरेकडून येणारे वारे महाराष्ट्रात न येता ते पूर्वेकडे जात आहे, तसेच बंगालच्या उपसागरातही सतत चक्रीय स्थिती तयार होत आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र गारठलेला असताना महाराष्ट्रात उबदार वातावरण आहे. कमाल किंचित कमी; पण किमान तापमानात वाढ झाली आहे. आगामी पाच ते सहा दिवस राज्यात असेच तापमान राहील. बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येत असल्याने राज्यात पहाटे सौम्य धुके पडेल.
- डॉ. अनुपम कश्यपी, निवृत्त हवामान विभागप्रमुख, आयएमडी, पुणे