राष्ट्रवादी शिबिरातून भुजबळ यांचे ‘अजित पर्व’ला आव्हान:मंत्री धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय

3 hours ago 3
राज्यात सत्तारूढ झाल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले दोनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशन शनिवारपासून शिर्डीत सुरू झाले. त्याला ‘अजित पर्व’ असे नाव देण्यात आले आहे. मंत्रिपद नाकारल्यामुळे पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे अधिवेशनाला जाणार नसल्याच्या चर्चा होत्या. पण पहिल्याच दिवशी हजेरी लावून सर्वांना चकित केले. गळ्यात ‘अजित पर्व’चा बॅज घालून आलेल्या भुजबळ यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वागत केले. त्यांना खुर्चीपर्यंत घेऊन गेले. त्यानंतर अर्धा तास भुजबळ बसले. मात्र कुणाशीही चर्चा न करता साई दर्शनासाठी ते निघून गेले. पटेल, तटकरेंमुळे आलो ‘प्रफुल्ल पटेल यांनी माझ्याशी दोन तास चर्चा करून येण्याची विनंती केली. तसेच सुनील तटकरे यांनीही फोनवर आग्रह केल्याने मी आलो,’ असे पत्रकारांना सांगताना अजित पवारांचा नामाेल्लेख टाळला. ‘हे शिबिर पक्षाचे असून कुणा एका व्यक्तीचे नाही’, असे सांगत भुजबळांनी शिबिराचे नाव ‘अजित पर्व’ असे ठेवल्याबद्दल व पक्षात अजित पवारांच्या असलेल्या एकाधिकारशाहीबाबत पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली. देवेंद्रांच्या गृह खात्यावर झिशान सिद्दिकींची टीका अजित पवार गटाचे आमदार झिशान सिद्दिकी म्हणाले,‘ मुंबईत कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. माझे वडील बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी देणाऱ्या अनेक बिल्डरांची नावे मी पोलिसांना दिली आहेत, तरी त्यांनी तपास केला नाही. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. मुंबईत अनेकांवर हल्ले होत आहेत. मात्र हल्ला होणारा व्यक्ती हिंदू किंवा मुस्लिम नसतो.’ असेही सांगत त्यांनी विरोधकांच्या टीकेबाबत सहमत नसल्याचे सांगितले. भुजबळांना अधिकार : तटकरे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, ‘भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पक्षात कुणीही नाराज नसून आम्ही सर्व एकसंघ काम करत आहोत.’ प्रफुल्ल पटेल म्हणाले,‘भुजबळ नाराज नाहीत. पक्षाच्या विचारसरणीस जोडले गेलेल्या अनेक नेत्यांनी मागील निवडणुकीत वेगळ्या भूमिका घेतल्या होत्या. मात्र पुन्हा पक्षात येणाऱ्यांचे स्वागत आहे. आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक परिस्थितीचा आढावा तसेच कार्यकर्त्यांचा विचार घेऊन महायुती ठेवायची की स्वतंत्र लढायचे हे निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जातील.’ मी कुणावरच नाराज नाही भुजबळ म्हणाले, ‘ठाकरेंच्या शिवसेनेतही मी होतो, तेथेही एकाधिकारशाही होती. मात्र तेथे ११ जणांचे मत विचारात घेतले जायचे. शरद पवारांच्या पक्षातही होतो. ते निश्चित यांच्यापेक्षा मोठे नेते आहेत. तिथे सगळ्यांचे मते जाणून घेतल्यानंतर निर्णय घेतला जायचा. काँग्रेसमध्ये तर पार्लमेंटरी बोर्डच निर्णय घेते. आमच्या पक्षात कुणाचा विचार घेतला जात नाही. मी स्पष्ट बोलतो त्याची शिक्षा मला मिळाली.’ ‘पुढचा प्रवास कसा असेल?’, या प्रश्नाच्या उत्तरावर ते म्हणाले, ‘मी इथे आलो. आता साईबाबांच्या दर्शनाला जाणार आहे. बाकीच्या भूमिका पुढच्या पुढे पाहू. माझी कुणावरही नाराजी नाही.’ सतीश चव्हाणांची घरवापसी, रामराजेही उपस्थित विधानसभेवेळी शरद पवार गटात गेलेले मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी पुन्हा अजित पवार गटात प्रवेश केला. अजित पवारांवर नाराज असलेले फलटणचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांनी उपस्थिती लावल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. पण वाल्मीक कराड प्रकरणामुळे टीकेचे धनी ठरलेले धनंजय मुंडे यांनी आजारपणाचे कारण देत पाठ फिरवली. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article