इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक 2025 मध्ये हिंदुस्थानी महिला संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात दमदार खेळाचे प्रदर्शन केले. दक्षिण आफ्रिकेचा 50 गुणांनी पराभव करत टीम इंडियाने पहिल्यावहिल्या खो खो विश्वचषकाच्या फायनलमध्ये अगदी थाटात प्रवेश केला आहे. फायनलचा सामना रविवारी (19 जानेवारी 2025) नेपाळविरुद्ध रंगणार आहे.
पहिल्या डावातच भारताने आपले इरादे स्पष्ट करत दक्षिण आफ्रिकेला सळो की पळो करून सोडले. या सामन्यात दोन्ही डावात हिंदुस्थानने प्रत्येकी 5 असे 10 ड्रीम गुण मिळवत दक्षिण आफ्रिकेला जोरदार धक्का दिला. कर्णधार प्रियांका इंगळेने आपला धमाकेदार खेळ कायम ठेवत 4 गुणांची कमाई करत संघाच्या विजयचा खारीचा वाटा उचलला. चारी टर्ममध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. दुसऱ्या टर्ममध्ये 33-10, तिसऱ्या टर्ममध्ये 38-16 आणि चौथ्या टर्ममध्ये टीम इंडियाने 66-16 अशा खेळ संपवत 50 गुणांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्यात सर्वोत्तम संरक्षक म्हणून निर्मला भाटी आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून वैष्णवी पवार यांना गौरविण्यात आले. तसेच सर्वोत्तम आक्रमक म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या सिनेतेंबा मोसिया या पुरस्कार देण्यात आला. दुसरीकडे महिला गटात नेपाळने युगांडाचा 81-18 असा धुव्वा उडवला आणि फायनलमध्ये प्रवेश मिळवला. दोन्ही संघांमध्ये फायनलची लढत रविवारी 19 जानेवारी रोजी रंगणार आहे.