जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील अनेक भागांत मागील काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. परिणामी येथील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात जोगेश्वरी विधानसभेचे शिवसेना आमदार अनंत (बाळा) नर यांनी केलेल्या मागणीची गंभीर दखल घेत लवकरच संबंधितांची बैठक घेऊन पाणीटंचाईवर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले.
जोगेश्वरी पूर्वेला असणाऱया मेघवाडी, शामनगर, इंदिरानगर, दत्तटेकडी, मजासवाडी, बांद्रेकरवाडी, गांधीनगर आदी परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तसेच जोगेश्वरीच्या विविध भागांतील नागरिकांना भेडसावणाऱया विविध समस्यांबाबत आमदार बाळा नर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी शिवसेना जोगेश्वरी विधानसभा समन्वयक रवींद्र (बावा) साळवी उपस्थित होते.
n वेरावली जलाशयातून जोगेश्वरी, गोरेगाव, अंधेरी,परिसराला पाणीपुरवठा केला जातो. येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी वेरावली येथे नवीन जलाशय बांधण्यात यावे, अशी सूचना आमदार बाळा नर यांनी पालिका आयुक्तांना केली आहे.