कंगना अन् सरसंघचालकांचे वक्तव्य ऐकल्यावर स्वातंत्र्याची व्याख्याच बदलायला हवी:श्रीरामा, आता तूच देश वाचव!- संजय राऊत

2 hours ago 2
कंगना राणावत म्हणते, मोदी पंतप्रधानपदी आले व तेथून देशात स्वातंत्र्याची पहाट उगवली. सरसंघचालकांनी शंख फुंकला की, अयोध्येत श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाल्यावरच खरे स्वातंत्र्य मिळाले. हे ऐकल्यावर स्वातंत्र्याची व्याख्याच बदलायला हवी, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, खऱ्या स्वातंत्र्यात सहभाग नसणाऱ्यांनाच हे दिव्य विचार सुचू शकतात. नव्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रासह देशात नमक हरामांच्या हवेल्या उभ्या राहिल्या त्याचे काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत म्हणाले की, आपला भारत देश नक्की कोठे फरफटत निघाला आहे ते पाहिले की, देशाच्या भविष्याची चिंता वाटते. कंगना राणावत हिला वाटते की, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले. त्याआधी स्वातंत्र्य नव्हते. कंगना राणावतप्रमाणे विचार करणाऱ्यांची एक पिढी गेल्या दहा वर्षांत भाजपने घडवली. संपूर्ण समाज आणि देश जात्यंध व धर्मांध करून भाजपला निवडणुका जिंकत राहायच्या आहेत. त्यात आता भर पडली आहे ती सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याची. सरसंघचालक भागवतांकडून तरी ही अपेक्षा नव्हती. भागवत यांनीही जाहीर केले की, “अयोध्येत राममंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली त्या दिवसापासून देशाला खरे स्वातंत्र्य लाभले आणि प्रतिष्ठा मिळाली.” भागवत यांचे विधान धक्कादायक आहे. एक तर प्रभू श्रीराम हे अवतार आहेत हे मान्य केले तर त्यांना बंदिवान करणारा मनुष्य जन्माला यायचा आहे. अयोध्येत एका जागेवर वाद झाला. ज्या जागेवर श्रीरामाचा जन्म झाला, ती जागा सगळ्यांनी मिळून मुक्त केली. त्यास धर्मस्वातंत्र्य म्हणता येईल, पण देशाला स्वातंत्र्य मिळाले ते 1947 साली व त्या स्वातंत्र्य संग्रामात भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काडीइतकेही योगदान नव्हते. त्यामुळे देशाचे स्वातंत्र्य हे काही लोकांना आपले स्वातंत्र्य वाटत नसावे. प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिष्ठापना देशाची प्रतिष्ठा वाढविणारे कार्य नक्कीच आहे, पण स्वातंत्र्याची व्याख्या तेथून सुरू झाली असे बोलणे हा स्वातंत्र्य लढय़ाचा अपमान आहे. …यावरही बोला सरसंघचालकांनी देशाच्या स्थितीवर परखड भाष्य करणे गरजेचे आहे. भारताचा रुपया डालरच्या तुलनेत 87 रुपयांइतका खाली कोसळला आहे. त्यामुळे उद्योगाला फटका बसेल, नोकऱ्या जातील, महागाई आणि गरिबी वाढेल. देश असा संकटात असताना रोमचा राजा काय करत होता? रोम जळत होते आणि नीरो बासरी वाजवीत होता. रामराज्यातही नीरो सुटाबुटात फिरत आहे, मौजमस्तीत दंग आहे. देशाची आरोग्य व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत म्हणवून घेणाऱ्या राज्यात आदिवासी पाड्यांवर साधे दवाखाने नाहीत. आजारी, गरोदर स्त्रियांना खांद्यावरून किंवा झोळीतून न्यावे लागते. मृत मुलांना घरी नेण्यासाठी आम्ब्युलन्स मिळत नाहीत तेव्हा मृतदेह खांद्यावर टाकून आई-बापांना मैलो न् मैल चालावे लागते. हे काही रामराज्यास स्वातंत्र्य मिळाल्याचे लक्षण नाही. एका रुग्णालयातून दुसऱया रुग्णालयात नेत असताना एका गर्भवती भारतीय महिलेचा मृत्यू झाल्याची जबाबदारी स्वीकारून पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्टा टेमिडो यांना राजीनामा द्यावा लागला होता. पुन्हा हे का घडले? याचा तपास करण्यासाठी तेथील सरकारने एक समिती नेमली. सँटा मारिया ढा नवजात बालकांच्या कक्षात जागा नसल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात नेले जात होते. यादरम्यान तिचा मृत्यू झाला व सरकार हादरले. भारतात असे मृत्यू रोजच होत आहेत. बीडमध्ये सरपंच देशमुखांचा भररस्त्यावर खून झाला व मुख्यमंत्री फडणवीस त्या विषयावर ‘एसआयटी, एसआयटी’ खेळत राहिले. रामराज्यात सरपंच संतोष देशमुख यांना जगण्याचे स्वातंत्र्य नव्हते काय? धर्मशास्त्र काय म्हणते? देश संविधानानुसार चालणार की धर्मशास्त्रानुसार? हा नवा बखेडा आता निर्माण झाला आहे. लाओत्से नेहमी म्हणत असे, “शास्त्र व पोथ्या वाचून माणसाला काहीही मिळत नाही.” यावर त्याचे समकालीन त्याला म्हणत असत, “तुम्ही तर शास्त्राचा पुष्कळ अभ्यास केला आहे. त्यात तुम्हाला काय मिळालं?” लाओत्से तेव्हा सांगत असे, “शास्त्र, ग्रंथ वाचल्यानेच त्यातून काहीही मिळत नाही, हा मला जो शोध लागला तोच अत्यंत मौलिक आहे.” लाओत्से जे सांगत होता तेच वीर सावरकरांनी सांगितले, पण हे ‘सावरकर’ भाजप मान्य करणार नाही. भाजपने देशात गद्दारीची बीजे रोवली व आज सर्वत्र गद्दारांचे उदंड पीक आलेले दिसत आहे. प्रभू श्रीरामाने रावणाचा पराभव करून लंकादहन केले ते बिभीषणाच्या सहकार्याने. बिभीषण हा रावणाचा भाऊ. श्रीरामाने त्यालाच फोडले व आपल्या बाजूने वळवले. तेथेच ‘राम-रावण’ युद्धाचे पारडे फिरले. रावणाचा वध झाल्यावर श्रीरामाने लंकेचे राज्य बिभीषणाच्या हवाली केले. बिभीषणाला लंकेचा राजा केले. त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शहा यांना श्रीरामापेक्षा बिभीषण प्रिय वाटत असावेत. त्यांच्या सत्तेचा डोलारा अशा अनेक बिभीषणांच्या करंगळ्यांवर उभा आहे व सरसंघचालक भागवत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर स्वातंत्र्य मिळाल्याची भाषा करतात. भारतात गद्दारीचा इतिहास मोठा आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही काही बिभीषण सरळ इंग्रजांच्या बाजूने होते व स्वातंत्र्यानंतर ते आपल्या घरांवर देशाचा तिरंगाही फडकवायला तयार नव्हते. इतिहासाची पाने चाळली तर भारतात तीन प्रमुख राजांनी गद्दारी केली. त्यामुळे हिंदुस्थानला गुलामीच्या बेड्या पडल्या. एकापेक्षा एक महान वीर व स्वाभिमानी राजे या मातीत जन्माला आले. ते इतिहासात अमर झाले, पण काही राजे त्यांच्या गद्दारीने प्रख्यात बनले. त्या सगळय़ात वरचे नाव आहे ते राजा जयचंदचे. जयचंदने महाराणा पृथ्वीराज चौहानशी गद्दारी केली नसती तर मोहम्मद घोरीने भारतावर कधीच विजय मिळवला नसता. त्याच मोहम्मद घोरीने पुढे जाऊन राजा जयचंदलाही खतम केले. दुसऱया क्रमांकावर राजा मानसिंगचे नाव घ्यावे लागेल. त्यानेही महाराणा प्रतापाशी बेईमानी करून अकबराची चाकरी पत्करली. मीर जाफर हा आणखी एक गद्दार. त्याच्याच गद्दारीमुळे इंग्रज राजवटीचा भारतात विस्तार झाला. जाफरच्या गद्दारीने लोक संतप्त झाले व जाफरच्या हवेलीचे नाव लोकांनी ‘नमक हराम की हवेली’ असे ठेवले. जाफर हा सिराज उदौलाचा सेनापती होता, पण नवाब बनण्याच्या लालसेपायी तो इंग्रजांना मिळाला, हेच सत्य आहे. बिभीषणाने रामाला साथ दिली तो धर्माचा लढा होता, पण महाराष्ट्रासह देशात आजच्या राज्यकर्त्यांनी असंख्य ‘नमक हरामांच्या हवेल्या’ निर्माण केल्या. तेच भाजपचे खरे राज्य आहे. अयोध्येत श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापनेनंतर जे स्वातंत्र्य मिळाले त्या स्वातंत्र्यात या नमक हरामी हवेल्या उभ्या राहिल्या. त्यामुळे श्रीरामाचे ‘सत्य’ पराभूत झाले. अनेकांना बिभीषण हाच खरा, असे वाटू लागले. भारताची धर्म संस्कृती ही अशी बदलत आहे. अयोध्येतील रामाला हे मान्य आहे काय? श्रीरामा, आता तूच देश वाचव!

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article