आंतरराज्यीय लुटारूंची टोळी जेरबंद Pudhari File Photo
Published on
:
19 Jan 2025, 5:11 am
Updated on
:
19 Jan 2025, 5:11 am
पुणे: हातचलाखीबरोबर प्रसंगी चाकूचा धाक दाखवून एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना लुटणार्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकेचे 147 एटीएम कार्ड, 50 हजारांची रोकड आणि एक चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.
समून रमजान (वय 36, रा.हरियाणा), नसरुद्दीन खान (वय 30), बादशाह खान (वय 24,रा. दोघे उत्तरप्रदेश) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यांचा चौथा साथीदार आदील सगीर खान (वय 30,रा. उत्तरप्रदेश) हा फरार झाला असून, त्यांच्या विरुद्ध राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर उत्तरप्रदेशात गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने तिघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शुक्रवारी (दि.17) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास माधवराव जललवाड (वय 56) हे कोंढणपूर फाटा येथील एका बँकेच्या एटीएमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी आरोपीपैकी एकाने चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दोन हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली.
त्यानंतर त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील एटीएम कार्ड घेतले. तसेच पिन क्रमांक देखील विचारून घेतला. त्यानंतर आरोपी चारचाकी गाडीतून पळून गेले. काही वेळात जललवाड यांच्या बँक खात्यातून 50 हजार रुपये काढल्याचा मेसेज आला.
तर दुसरीकडे त्याच दिवशी राजगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी एका संशयित मोटार ताब्यात घेतली. पुणे-सातारा रोडवरून खेड-शिवापूरमार्गे कोल्हापूरला ही मोटार निघाली होती.
गाडी दिसताच राजगड पोलिसांनी तिला थांबविले. चौकशी सुरू असताना एक व्यक्ती पळून गेला. जललवाड यांच्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना समजता त्यांनी ताब्यात घेतलेली मोटार दाखविली. त्यांनी ती ओळखली. चौकशीत तिघा आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.