युरियासाठी शेतकर्यांना करावी लागतेय भटकंतीFile Photo
Published on
:
19 Jan 2025, 7:49 am
Updated on
:
19 Jan 2025, 7:49 am
कळस: इंदापूर तालुक्यामध्ये शेतकर्यांना पुरेशा प्रमाणात युरिया मिळत नसल्याने ऐन रब्बी हंगामाच्या काळात शेतकर्यांना युरियासाठी खतांची दुकाने शोधत फिरावे लागत आहे. कृषी विभागाचे अधिकारी व पंचायत समितीचे अधिकारी यांना इंदापूर तालुक्यासाठी किती युरिया आला हेच माहीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सध्या शेतकरीवर्ग हा बदलत्या वातावरणाचा पिकांवर होणार्या परिणामाला तोंड देत असतानाच त्यांना युरियासाठी फिरावे लागत आहे. युरियाची मागणी केल्यानंतर खत दुकानदार हे युरियाबरोबर इतर खते शेतकर्यांच्या माथी मारत आहेत. त्यामुळे शेतकर्यांना नाइलाजाने गरज नसताना इतर खते घ्यावी लागत आहेत.
युरिया घेण्यासाठी दुकानांमध्ये शेतकरी गेल्यानंतर अगोदर दुसरी खते घ्यावी लागतील, असे दुकानदार सांगतात. कृषी विभागाचे अधिकारी वर्ग याकडे लक्ष देत नसल्याचे शेतकर्यांची तक्रार आहे. सध्या ऊस तोडणी सुरू असून ऊस तुटल्यानंतर शेतकरी गहू, मका घेतात. या पिकांना सुरुवातीला खुरपणीनंतर युरिया खताची आवश्यकता असते. मात्र युरियाच मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.
दरम्यान इंदापूर तालुक्यामध्ये शेती औषधे दुकाने 470 असून बियाण्यांची 338 तर खतांची 410 दुकाने असून यातील 4 दुकानांचा परवाना रद्द केल्याचे तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी सांगितले.
युरियाची विक्री काही दुकानदार जास्त दराने करतात. त्यामुळे प्रत्येक खत दुकानदाराने दुकानासमोर फलक लावले पाहिजेत व त्या फलकावर दररोज खतांचा साठा लिहिला पाहिजे आणि कृषी विभागाने त्यांच्या गोडाऊनची तपासणी केली पाहिजे.
जनार्दन पांढरमिसे, शेतकरी, रुई
दि. 31 डिसेंबर 2024 पर्यंत तालुक्यामध्ये 6163.77 मेट्रिक टन युरिया शिल्लक होता. खत दुकानदार युरिया देत नसल्यास शेतकर्यांनी कृषी विभागाला कळवावे.
भाऊसाहेब रुपनवर, तालुका कृषी अधिकारी, इंदापूर