पाकिस्तान क्रिकेट टीमचा मायदेशात कसोटी सामन्यातील विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. पाकिस्ताने इंग्लंडनंतर आता विंडीज विरुद्ध विजय मिळवला आहे. पाकिस्तानने मुलतानमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी विंडीजवर 127 धावांनी मात केली आहे. पाकिस्ताने विंडीजसमोर विजयासाठी 251 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पाकिस्तानच्या फिरकीसमोर विंडीज 123 धावांवर ढेर झाली. या सामन्यात फिरकी गोलंदाजांचा धमाका पाहायला मिळाला. पाकिस्तानच्या साजीद खान आणि नोमान अली या दोघांनी 20 पैकी 15 विकेट्स घेतल्या. तर उर्वरित 5 विकेट्स इतर फिरकी गोलंदाजांनी मिळवल्या.
पाकिस्तानची विजयी सलामी
विंडीज टीम 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. मुलतानमध्ये झालेला सलामीचा सामना हा लो स्कोअरिंग राहिला. दोन्ही संघांना फार मोठी धावसंख्या करता आली नाही. फिरकी गोलंदाजांनी हा सामना गाजवला. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद याने 17 जानेवारीला टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पाकिस्तानने पहिल्या डावात 230 धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानने विंडीजला पहिल्या डावात 137 धावांवर रोखलं. पाकिस्तानने यासह 93 धावांची निर्णायक आघाडी घेतली. पाकिस्तानने त्यानंतर दुसऱ्या डावात 157 धावा केल्या. त्यामुळे विंडीजला विजयासाठी 251 धावांचं आव्हान मिळालं. मात्र विंडीजला दुसऱ्या डावात 137 धावाच करता आल्या. पाकिस्तानने अशाप्रकारे हा सामना 127 धावांनी जिंकला.
फिरकीपटूंचा दबदबा
दरम्यान दोन्ही संघांच्या फिरकीपटूंनी हा सामना गाजवला. विंडीजच्या फिरकी गोलंजाजांनी 14 विकेट्स घेतल्या. तर वेगवान गोलंदाजांना फक्त 3 विकेट्सच घेता आल्या. तर पाकिस्तानकडून साजिद खान याने 9 आणि नोमान अलीने 6 विकेट्स घेतल्या.
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कर्णधार), मुहम्मद हुरैरा, बाबर आझम, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान आगा, साजिद खान, नोमान अली, खुर्रम शहजाद आणि अबरार अहमद
वेस्ट इंडीज प्लेइंग ईलेव्हन : क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), मिकाईल लुईस, केसी कार्टी, कावेम हॉज, अॅलिक अथानाझे, जस्टिन ग्रीव्हज, टेविन इमलाच (विकेटकीपर), गुडाकेश मोटी, केविन सिंक्लेअर, जोमेल वॉरिकन आणि जेडेन सील्स.