बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सध्या मराठवाड्यातील राजकारण तापलं आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आंदोलन केले जात आहेत. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मकोका लावण्यात आला आहे. तर वाल्मिक कराड यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करून त्यांनाही मकोका लावण्यात आला आहे. या सर्व हत्याकांडामागचे सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा दावा विरोधक करत आहेत. तर कराड हे धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे सहकारी असल्याने मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती. त्यातच आता संतोष देशमुख हत्याप्रकरण धनंजय मुंडेंना भोवल्याचे मिळत आहे. कारण बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवारांची नियुक्ती झाली आहे. आता या प्रकरणी धनंजय मुंडे पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केले आहे.
धनंजय मुंडे यांनी नुकतंच जाहीरपणे भाषण केले. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच संतोष देशमुख यांचे नाव घेत विरोधकांवर टीका केली. मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करत आहेत. बीड जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आली आहे. फक्त बीड नाही तर संपूर्ण मराठवाड्यात सामाजिक सलोखा बिघडला आहे. आम्ही शिव, शाहू, फुले यांच्या विचाराचे आहोत का? असे प्रश्न आम्हाला विचारले जातात. आपला एकमेव पक्ष आहे जो शिव, शाहू, फुलेंच्या विचाराने चालतो, असे धनंजय मुंडे म्हणाले.
“संतोष देशमुख यांच्या हत्येचे कोणी समर्थन करु शकत नाही”
“बीड जिल्ह्यात आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. त्याच समर्थन कोणीच करु शकत नाही. ज्यांनी केलं त्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे. त्या ५-८ गुन्हेगारांमुळे मिडिया ट्रायल होत आहे. बीडचा बिहार झाला, कोणी केला? १२ ज्योतिर्लिंगेपैकी परळी एक आहे. पण एका गावाला आणि एका जिल्ह्याला बदनाम केल जातं आहे”, असे धनंजय मुंडेंनी म्हटले.
“माझ्या वैयक्तिक विषयात पक्ष माझ्यामागे”
“मी हात जोडून विनंती करतो माझ्या वैयक्तिक विषयात पक्ष माझ्या मागे उभा राहिला. माझ्या देहावरील अग्नीचा धूर देखील त्याची परतफेड करु शकत नाही. जेव्हा गरज पडली तेव्हा आम्ही तुमच्यासाठी शत्रूंना शिंगावर घेण्यात मागे हटलो नाही. टीका करायचच ठरलं तर माझ्यासारखा टीकाकार कोणी होऊ शकत नाही. आपल्याला नवसंकल्प करायचा असेल तर कार्यकर्त्याला तेवढा विश्वास ठेवला पाहिजे… अविश्वास दाखवून काय होणार?” असा सवाल धनंजय मुंडेंनी केला.