उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूमुळे; जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनाFile Photo
Published on
:
19 Jan 2025, 8:09 am
Updated on
:
19 Jan 2025, 8:09 am
लातूर, पुढारी वृत्तसेवा
उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ (एच५एन१) या विषाणूजन्य आजाराने (बर्ड फ्ल्यू ) झाल्याचे भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहे. यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यावस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्ष वर्षा ठाकूर-घुगे यांनी प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अन्वये आदेश निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक नगरपरिषद वाचनालय व पाण्याची टाकी येथील १० किलोमीटर त्रिज्येतील परिसर सतर्क भाग (अलर्ट झोन) घोषित करण्यात आला आहे. कावळ्यांचा मृत्यू झालेल्या बाधित क्षेत्रामध्ये नागरिकांच्या हालचालीस, तसेच इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. याठिकाणची खाजगी वाहने बाधित परिसराच्या बाहेर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या परिसराचे सोडियम हायड्रोक्साईड किंवा सोडियम हायपोक्लोराईट किंवा पोटॅशियम परमॅग्नेटने निर्जंतुकीकरण करावे. प्रभावित क्षेत्राच्या १० किलोमीटर त्रिज्येतील कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे वैद्यकीय नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.