परळच्या सेठ गोरधनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयाच्या शतक महोत्सवास आज शनिवारी शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले असून एखाद्या आरोग्य क्षेत्रातील संस्थेने सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
केईएम रुग्णालयाच्या शताब्दी वर्षातील उपक्रमांचा शुभारंभ या सोबतच रुग्णालयाचे डॉक्टर्स आणि कर्मचारी यांच्यासाठी नियोजित एकवीस मजली इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काwशल्य, रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अजय चौधरी, आयुक्त भूषण गगराणी आदी उपस्थित होते.
स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलले
पालिकेचे केईएम रुग्णालय एफ साऊथमध्ये असताना या ठिकाणचे महत्त्वाच्या लोकप्रतिनिधींना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले नाही. शिवसेनेच्या सत्ताकाळात केईएमच्या विकासाची अनेक कामे झाली असताना, अनेक डिपार्टमेंट सुरू झाली असतानाही आपल्याला या सोहळ्याचे निमंत्रण का दिले नाही, असा सवाल मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी केला.