अखेर राज्याच्या पालकमंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. संख्याबळाच्याच आधारे महायुतीत पालकमंत्रीपदाचं वाटप झालं आहे. पालकमंत्रीपदाबाबत जुनाच फॉर्म्युला वापरण्यात आला असून त्यात फार फेरफार करण्यात आलेला नाही. मात्र, सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे मुंडे बंधू आणि भगिनींना बीडचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही. पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर धनंजय मुंडे यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांचं राजकीय दोर कापले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू असतानाच धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मीच अजितदादांना बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली होती, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून पडद्यामागची हकीकत सांगितली आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
सद्यस्थितीत मला कोणतेही…
बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो. सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे यांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
काय घडलं?
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने मराठवाड्यातील राजकारण अत्यंत तापलं आहे. मराठवाड्यातील जनता रोज रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. याप्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मकोका लावण्यात आला आहे. तर वाल्मिक कराड यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करून त्यांनाही मकोका लावण्यात आला आहे. या सर्व हत्याकांडामागचे सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचा दावा विरोधक करत आहेत. तर कराड हे धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे सहकारी असल्याने मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती.
तसेच देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणीही केली जात होती. बीड जिल्ह्यातील जनतेचा हा रोष पाहता धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद नाकारण्यात आलं आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्याकडेही बीडची जबाबदारी देण्यात आलेली नाही. पहिल्यांदाच बीडच्या पालकमंत्रीपदापासून मुंडे बंधूभगिनींना वंचित राहावं लागलं आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी स्वत: बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारल्याने बीडमधील वातावरण शांत होण्यास मदत मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.