भंडारा : अवैधरित्या सहकारी संस्था स्थापन करून त्या माध्यमातून अनेकांना कोट्यवधीची गुंतवणूक करण्यास भाग पाडून १ कोटी १६ लाखाने फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर लाखांदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हितेश मधुकर चुटे (३५) रा. सडक अर्जुनी, रत्नेश गुरूप्रसाद तिवारी (४५) रा. वडसा जि. गडचिरोली, किशोर चरणदास गोंडाणे (४५) रा. परसटोला ता. अर्जुनी मोरगाव, मंगेश डाकराम वाणी (४२) रा. पाहूणगाव ता. लांजेवार, रवींद्र प्रल्हाद बोरकर (५१) रा. इटान ता. लाखांदूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी सहकारी संस्था किंवा शासनाच्या अधिकृत वित्तीय संस्थेचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसतांना जीटीकोर एसटी कन्स्लटन्सी नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून अनेकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून १० फेब्रुवारी २०२३ ते १५ जून २०२४ या कालावाधीत १ कोटी १६ लाख रुपयाची गुंतवणूक करायला लावली. ही ठेवी स्वत:कडे अवैधरित्या ठेऊन त्यांचा विश्वासघात करून फसवणूक केली. याप्रकरणी पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पवार करीत आहेत.