Published on
:
16 Nov 2024, 11:42 pm
Updated on
:
16 Nov 2024, 11:42 pm
चंदिगढ : मुर्रा प्रजातीचे युवराज, सुल्तान यासारख्या अनेक रेड्यांनी त्यांच्या अवाढव्य देहाने व किमतीने देशभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. हरयाणातीलच सिरसा जिल्ह्यात असाच एक विलक्षण रेडा असून त्याचे नाव ‘अनमोल’ आहे. नावाप्रमाणेच हा रेडा त्याच्या मालकासाठी अनमोल ठरला असून सध्या हा रेडा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या रेड्याचे वजन तब्बल 1500 किलो असून त्याच्या आलिशान जीवनशैलीमुळे हा रेडा चर्चेचा विषय ठरला आहे. अनमोलची किंमत 23 कोटी रुपये आहे. हा रेडा केवळ त्याच्या आकारासाठीच नाही तर त्याच्या लक्झरी लाईफस्टाईलसाठीही प्रसिद्ध आहे. पुष्कर जत्रेत त्याचे प्रदर्शन भरविण्यात आले असून मेरठच्या अखिल भारतीय शेतकरी मेळाव्यातही अनमोलने बाजी मारली आहे. त्याचे वीर्य विकून महिन्याला पाच लाख रुपयांची कमाई अनमोलचा मालक करत आहे.
अनमोलचे खरे वैशिष्ट्य त्याच्या किमतीत दडलेले आहे. अनमोल त्याच्या विशिष्ट जातीसाठी प्रसिद्ध असून त्याच्या वीर्याला मोठी मागणी आहे. अनमोलची किंमत 23 कोटी रुपये असून ही किंमत दोन रोल्स रॉयस कार किंवा दहा मर्सिडीज बेंझ कारइतकी आहे. तर त्याच्या वीर्य विक्रीतून दरमहा 5 लाखांची कमाई केली जाते. या रेड्याची जीवनशैली शाही थाटाची आहे. आठ वर्षांच्या या रेड्याची विशेष काळजी घेतली जाते. त्याचा आहार देखील एखाद्या राजापेक्षा कमी नाही. अनमोलच्या रोजच्या आहारावर 1500 रुपये खर्च होतो. अनमोल दररोज 250 ग्रॅम बदाम, 4 किलो डाळिंब, 30 केळी, 5 लिटर दूध आणि 20 अंडी खातो. याशिवाय अनमोलला ऑईल केक, हिरवा चारा, तूप, सोयाबीन आणि मका देखील खायला दिले जाते जाते. अनमोलला दिवसातून दोनदा अंघोळ घातली जाते. त्याला बदाम आणि मोहरीच्या तेलाने मसाज दिला जातो. अनमोलची आईही खास असून ती दिवसाला 25 लिटर दूध देत असे.