गिरवी, निरगुडी परिसरात जनतेशी संवाद साधताना सत्यजितराजे ना. निंबाळकर व इतर.Pudhari Photo
Published on
:
17 Nov 2024, 2:08 am
Updated on
:
17 Nov 2024, 2:08 am
फलटण : फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघातील दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी आ. रामराजे ना. निंबाळकर यांनी भगीरथ प्रयत्न केले. या प्रयत्नांना आ. दीपक चव्हाण यांची सक्रिय साथ लाभल्याने तालुक्याचा चौफेर विकास होत आहे. विकास पर्व कायम ठेवण्यासाठी दीपक चव्हाण कटिबद्ध असून याही वेळेस फलटणकर त्यांना चौथ्यांदा विधानसभेत पाठवतील, असा विश्वास युवा नेते सत्यजितराजे ना. निंबाळकर यांनी व्यक्त केला.
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ गिरवी, निरगुडी परिसरात ठिकठिकाणी नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी गिरवीचे सरपंच राजेंद्र कदम, संजय मदने, विजय कदम, नितीन निकाळजे, कुंडलिक निकाळजे, सौरभ कदम, राजेंद्र कदम, संकेत सस्ते, निळकंठ धुमाळ उपस्थित होते.
सत्यजितराजे पुढे म्हणाले, आ. रामराजे यांनी तालुक्याच्या दुष्काळी भागाकडे विशेष लक्ष देऊन आदर्की ते आंदरुड परिसरातील शेत शिवारात शेताच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवल्याने दुष्काळी भाग हरितमय झाला आहे. येथील जनतेचा पिढ्यानपिढ्यांचा पाणी संघर्ष संपला आहे. शेतकरी समृद्ध होत आहे. तालुक्याच्या या विकासात्मक कार्याला आ. दीपक चव्हाण यांची गत पंधरा वर्षांपासून सक्रिय साथ लाभली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न विधानसभेत पोट तिडकीने मांडून ते सोडवून घेण्यासाठी दीपक चव्हाण सतत आग्रही असतात. संयमी, कर्तव्यदक्ष, नेत्यांशी व जनतेशी निष्ठा असलेले आ. दीपक चव्हाण यांना जनतेने मोठ्या मताधिक्याने चौथ्यांदा विधानसभेत पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले.
विरोधकांच्या भुलथापांना जनता भीक घालणार नाही : दीपक चव्हाण
ढवळ परिसरात मतदारांशी संवाद साधताना आ. दीपक चव्हाण म्हणाले, राजकारणातून समाजकारणाचा वसा आणि वारसा राजे गटाच्या माध्यमातून गत 15 वर्षांपासून जपत आलो आहे. तालुक्यात गावोगावी विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. याउलट विरोधकांनी तालुक्यात गावोगावी काय विकास केला? जनतेच्या सुखदुःखात ते किती समरस झाले हा संशोधनाचा विषय आहे. विकास कामे कोणी केली हे जनतेला चांगलंच माहिती आहे. विरोधकांच्या भूलथापांना राजे गटावर प्रेम करणारी जनता कदापि भीक घालणार नाही. मायबाप मतदारांनी मला मतदानरुपी आशीर्वाद देऊन तालुक्याची सेवा करण्याची पुनश्च संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.