टाकेद : महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना रोहित पवार. समवेत खासदार राजाभाऊ वाजे व पदाधिकारी.Pudhari News Network
Published on
:
17 Nov 2024, 3:56 am
Updated on
:
17 Nov 2024, 3:56 am
सिन्नर : आम्ही घडाळाच्या उमेदवाराला एकच सांगतो, आम्हाला कुणालाही हत्तीच्या पायाखाली तुडवायचे नाही. शिव- शाहू-फुले- आंबेडकर- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे - अहिल्याबाई होळकर यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राला समता आणि एकतेचा विचार दिला आहे. आम्ही तुडवातुडवीची भाषा करीत नाही. पण आमच्या नादी कोणी लागले, तर आम्ही सोडत नाही, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांना दिला. संविधानाने दिलेल्या ताकदीचा वापर करून महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांना निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केली.
महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार उदय सांगळे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 16) टाकेद येथील अनुसया लॉन्स येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.
व्यासपीठावर खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सत्यजित तांबे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, गोकुळ पिंगळे, पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ, नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक भारत कोकाटे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, इगतपुरीचे नगराध्यक्ष संजय इंदूलकर, नईम खान, काशीनाथ कोरडे, दिनेश धात्रक, अॅड. संजय सोनावणे, प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, माजी सरपंच संजय सानप, हरिदास लोहकरे, पंडित लोंढे, अरुण चव्हाणके, संगीता गायकवाड, आदिवासी सेनेचे दि. ना. उघाडे, समाधान वारुंगसे आदी उपस्थित होते.
अजित पवार यांच्या उपस्थितीत सिन्नर येथे झालेल्या सभेत माणिकराव कोकाटे यांनी उदय सांगळे यांच्यावर आरोपांची राळ उडवली होती. उदय सांगळे यांनी खासदार वाजे यांच्याशी गद्दारी केली, असे लोक माझ्यासोबत असते, तर त्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवले असते, शिवराळ भाषाही वापरली होती. कोकाटे यांच्या याच वक्तव्याचा खरपूस समाचार रोहित पवार यांनी घेतला. छत्रपती संभाजी महाराजांनी अनाजीपंतासारखी प्रवृत्ती हत्तीच्या पायाखाली दिली होती. त्याने समाजात तेढ व कुटुंबात फूट पाडली होती. जवळ राहून गद्दारी केली होती. त्यामुळे संभाजी महाराजांनी त्या काळात अनाजीपंताला हत्तीच्या पायाखाली तुडवले होते, असा दाखलाही पवार यांनी दिला. खासदार राजाभाऊ वाजे व उदय सांगळे यांच्यासमवेत सिन्नर मतदारसंघाच्या विकासासाठी ठामपणे उभा राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली. आमदार तांबे यांनीही उदय सांगळे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून विजयी करण्याचे आवाहन केले.
सांगळेंना विजयी करा : भारत कोकाटे
जातीपातीच्या राजकारणात न पडता उदयभाऊ सांगळे यांच्यासारखे विकासाची दूरदृष्टी असलेले सक्षम नेतृत्व या निवडणुकीच्या माध्यमाने विधानसभेत पाठवा. खासदार राजाभाऊ वाजे आणि उदयभाऊ मिळून टाकेद गट आणि सिन्नर तालुक्याचा निश्चितपणे विकास करतील, अशी ग्वाही मजूर फेडरेशनचे संचालक भारत कोकाटे यांनी दिली.
...तर खासदारकीचा उपयोग होणार नाही : खा. वाजे
महाविकास आघाडीचे धडाडीचे उमेदवार उदयभाऊ सांगळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, अन्यथा मला खासदार करून काहीच उपयोग होणार नाही, अशी भावनिक साद खासदार राजाभाऊ वाजे यांनी मतदारांना घातली.