वेस्ट इंडिजने चौथ्या टी 20i सामन्यात इंग्लंडवर 5 विकेट्सने विजय मिळवला. इंग्लंडने डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात विंडिजसमोर 219 धावांचं आव्हान ठेवलं होतं. विंडिजने हे आव्हान 5 विकेट्स गमावून 6 बॉलआधी पूर्ण केलं. विंडिजने 19 ओव्हरमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 221 धावा केल्या. विंडिजने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत विजया खातं उघडलं. मात्र इंग्लंडला या पराभवानंतरही काही फरक पडणार नाही,कारण त्यांनी ही मालिका आधीच जिंकली आहे. इंग्लंड या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. आता मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना हा 18 नोव्हेंबरला होणार आहे.
टॉस गमावून बॅटिंगला आलेल्या इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 218 धावा केल्या. इंग्लंडसाठी जेकब बेथेल याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. फिलिप सॉल्ट याने 35 बॉलमध्ये 55 रन्स केल्या. विल जॅक्स 25, कॅप्टन जॉस बटलर 38 आणि सॅम करन याने 24 धावा जोडल्या. तर लियाम लिविंगस्टोनने 4 धावा केल्या. तर जेकबने 32 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 4 फोर ठोकून नॉट आऊट 62 रन्स केल्या. जेकबने केलेल्या या खेळीमुळे इंग्लंडला 200 पार पोहचवलं. विंडिजकडून गुडाकेश मोती याने 2 विकेट्स घेतल्या. तर अल्झारी जोसेफ आणि रोस्टन चेस या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
विंडिजची बॅटिंग आणि 1 ओव्हरआधी विजयी
विंडिजची अफलातून सुरुवात झाली. एविन लुईस आणि शाई होप या सलामी जोडीने विस्फोटक सुरुवात केली. या सलामी जोडीने चौफेर फटकेबाजी करुन विंडिजच्या विजयाचा पाया रचला. या जोडीने 136 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यानंतर विंडिजने 10 व्या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलवर सलग 3 विकेट गमावल्या. एविन लेव्हिस 68 आणि शाई होप याने 54 धावा केल्या. निकोलस पूरन झिरोवर आऊट झाला. त्यामुळे विंडिजची 136-0 वरुन 136-3 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतरही विंडिजच्या इतर फलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडली आणि विजय मिळवून दिला.
कॅप्टन रोव्हमॅन पॉवेल याने 38 धावांची निर्णायक खेळी केली. शिमरॉन हेटमायरने 7 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरा. त्यामुळे विंडिजची स्थिती 5 बाद 196 अशी झाली. त्यानंतर शेरफेन रदरफोर्ड आणि रोस्टन चेस या जोडीने विंडिजला विजयी केलं. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद 25 धावांची विजयी भागीदारी केली. शेरफेनने 29 आणि रोस्टनने 9 धावा केल्या. इंग्लंडकडून रेहान अहमद याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर जॉन टर्नर याला एक विकेट मिळाली.
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन : रोवमन पॉवेल (कर्णधार), एविन लुईस, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, शेरफेन रदरफोर्ड, गुडाकेश मोटी, अल्झारी जोसेफ, अकेल होसेन आणि ओबेद मॅककॉय.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), विल जॅक्स, जेकब बेथेल, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, डॅन मौसली, जेमी ओव्हरटन, रेहान अहमद, जॉन टर्नर आणि साकिब महमूद.