कळवण : प्रचार दौर्याप्रसंगी मतदारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस - महायुतीचे उमेदवार नितीन पवार.Pudhari News Network
Published on
:
17 Nov 2024, 4:05 am
Updated on
:
17 Nov 2024, 4:05 am
नाशिक : कळवण - सुरगाणा मतदारसंघाचा सर्वांगीण आणि सुंदर विकास आमदार नितीन पवार हेच करू शकतात. त्यामुळे त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणत विधानसभेत पाठविण्याचा निर्धार मतदारसंघातील मतदारांनी केला आहे.
कळवण - सुरगाणा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. नितीन पवार यांनी शनिवारी (दि. 16) निवाणे, दह्याणे, भुसणी, नाकोडा, पाटविहीर, मोकभणगी, एकलहरे, हिंगळवाडी, कळमथे, बार्डे, गोसराणे, अभोणा आदी ठिकाणी प्रचार दौरा केला. गावागावांमधील बांधवांनी आदिवासी नृत्य व फुलांची उधळण करीत आ. पवार यांचे जंगी स्वागत केले. नितीन पवारांनी मतदारांशी सुसंवाद साधत जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.
प्रचार दौर्यावेळी मोकभणगी, अभोणा येथे छोटेखानी सभेत पवार यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, गेल्या 35 वर्षांत सुरगाणा तालुक्याचा विकास झाला नाही. पण, आमच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. गेल्या पाच वर्षांत कळवणप्रमाणे सुरगाणा तालुक्यातील प्रत्येक गावात सभामंडप, स्मशानभूमी, पाणीपुरवठा योजना, दिवाबत्ती, सिमेंट - काँक्रीटचे रस्ते, शेती सिंचनासाठी सिमेंट बंधारे अशी विकासकामे केल्याचे पवार यांनी सांगितले. स्व. ए. टी. पवार यांनी तालुक्यात लघुपाटबंधारे प्रकल्पांची शृंखला जोडताना अर्जुनसागरसारखा मोठा प्रकल्प बांधून तालुका पाण्याने सुजलाम - सुफलाम केला आहे. जिरायती शेती बागायती केली असून, या ठिकाणी कांदा, मका, सोयाबीन व भाजीपाला अशी नगदी पिके घेतली जातात. त्यामुळे शेतकर्यांच्या हातात चार पैसे आले आहेत.
याप्रसंगी शिरीष शहा, राजू वेढणे, जि.प.चे माजी सदस्य यशवंत गवळी, बाळासाहेब सूर्यवंशी, कृष्णकुमार कामळस्कर, नथू भदाणे, सुनील ठोके, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र भामरे, शेतकरी संघटनेचे देवीदास पवार, भाजपचे सुधाकर पगार, रिपाइंचे बापू जगताप आदी उपस्थित होते.
कळवण तालुक्यातील पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात उसाचे पीक घेतले जात होते पण काही जणांच्या महाप्रतापामुळे वसाकासारखा मोठा साखर कारखाना बंद पडला. ज्यांनी वसाका बंद पाडला, ते शेतकर्यांची दिशाभूल करून विरोधकांशी हातमिळवणी करत आहेत. या सर्वांना येत्या 20 तारखेला त्यांची जागा दाखवून देत मला विधानसभेत पाठवावे, असे आवाहन आ. नितीन पवार यांनी मतदारांना केले.