राहुल गांधींनी पत्रकारांवर केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने निषेधfile photo
Published on
:
17 Nov 2024, 6:09 am
Updated on
:
17 Nov 2024, 6:09 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माध्यमांना लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी यांनी पत्रकारांना मालकांचे गुलाम असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले काही दिवस राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रभर सभा होत आहेत. माध्यमांनी त्यांना भरभरून प्रसिद्धी दिली आहे. तरीही सर्व मिडियावाले फक्त मोदींचे दाखवता, पोटाची भूक शमविण्यासाठी मालकाचे त्यांना ऐकावे लागतं. एक प्रकार हे गुलाम आहेत. यांच्याशी माझी लढाई नाही. हे आमचे काही दाखवणार नाहीत, २४ तास फक्त मोदींचे दाखवणार, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
माध्यम आणि पत्रकारांचा पाणउतारा केल्याने पत्रकारांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने आणि महाराष्ट्र अध्यक्ष कैलासबापू देशमुख यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात पत्रकारांनी योगदान दिले. आजही समाजातील विविध घटकांना न्याय देण्यासाठी पत्रकार धडपड करतात. त्यांना गुलाम संबोधण्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. केवळ धामणगाव रेल्वे येथेच ते असे बोलले नाहीत, तर प्रत्येक सभेत पत्रकारांचा ते अपमान करतात. राहुल गांधी यांनी पत्रकारांवर ज्या पद्धतीने टीका केली त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असे अध्यक्ष सुने यांनी म्हटलं आहे.