एमडी प्रकरणातील संशयितांची नार्को टेस्ट करण्याची आक्रमक मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांनी केली.FILE
Published on
:
17 Nov 2024, 6:05 am
Updated on
:
17 Nov 2024, 6:05 am
नाशिक : क्रांतिकारकांची भूमी, भाविकांचे शहर, मंत्रभूमी ते तंत्रभूमी, शैक्षणिक हब अशा विविध बिरुदावली मिरवणाऱ्या नाशिकची ड्रग्ज संस्कृतीमुळे महाराष्ट्रासह देशात बदनामी झाली आहे. शहरातील तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यात ओढणाऱ्या माफियांना सत्ताधाऱ्यांचा राजाश्रय लाभला आहे, असा आरोप करत एमडी प्रकरणातील संशयितांची नार्को टेस्ट करण्याची आक्रमक मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांनी केली.
मध्य मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते यांनी नाशिक शहराला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी 'भयमुक्त व ड्रग्जमुक्त नाशिक' करण्यासाठी कंबर कसली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना गिते म्हणाले की, गेल्या १० वर्षांत केंद्र, राज्य व महापालिका अशी एकाच पक्षाच्या हाती सत्ता असतानाही, मुंबई, पुणे, नागपूर या शहरांच्या तुलनेत नाशिक भकास झाले. येथील आमदारांनी शेवटच्या महिन्यात उद्घाटने करीत विकासाचा आव आणला. परंतु नाशिककर सर्व जाणून आहेत. शहरात गांजा, चरस, कुत्ता गोली तसेच ड्रग्जची खुलेआम विक्री होत आहे. ड्रग्जमाफियांनी शाळा - महाविद्यालयांभोवती जाळे विणले आहे. शहर पोलिस कार्यक्षम आहेत. मात्र ड्रग्ज प्रकरणात कारवाई करू नये, यासाठी पोलिसांवर दबाव टाकला जात आहे. पोलिसांना बदल्या करण्याची धमकी दिली जाते, असा आरोप गिते यांनी केला.
गुन्हेगारांना सोडवण्यासाठी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला जातो. ड्रग्ज प्रकरणातील संशयित आरोपी जामिनावर सुटल्यानंतर दीर व मुलाला घेऊन त्याच्या स्वागतासाठी कोण गेले होते, असा सवालही गिते यांनी उपस्थित केला. मुस्लीम समाजामध्ये दरी निर्माण करणाऱ्यांनी मराठा व ओबीसी यांच्यात वाद लावला. त्यांना मतदानातून धडा शिकवा व मला विजयी करा, असे आवाहन गिते यांनी केले.
नाशिक बदनामीच्या गर्तेत !
मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे शिंदे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्ज व त्यासाठी लागणारा कच्चा माल सापडल्यामुळे राज्याला हादरा बसला. त्यानंतर शहराला ड्रग्जचा विळखा बसल्याचे विविध घटनांमधून पुढे आले. शहराच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्हाला एमडी ड्रग्ज सहज उपलब्ध होते. हे ड्रग्ज मिळवण्यासाठी घरात चोरी करणे, खोटे बोलणे, बाहेरून पैसे उधार घेणे असे प्रकार घडत आहेत.