विधनासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क आहेत. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यात कडक तपास मोहीम सुरू आहे. तपासणीदरम्यान नागपुरात 14 कोटींचे सोने जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातस्थित कंपनी सिक्वेल लॉजिस्टिकद्वारे दागिने आणि बिस्किटांच्या स्वरूपात सोन्याची वाहतूक केली जात होती. हे सोने गुरूवारी गुजरातहून विमानाने नागपुरमध्ये आणण्यात आले होते. त्यानंतर ते अमरावतीत नेण्यात येत होते.
अंबाझरी तलावाकडून वाडीकडे जात असताना वाहनाच्या तपासणीदरम्यान सोने जप्त करण्यात आले. जप्त केलेले सोने अंबाझरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. चौकशीदरम्यान निवडणुकीच्या वातावरणात एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने घेऊन जाण्यासाठी सिक्वेल लॉजिस्टिकला निवडणूक आयोगाची परवानगी नसल्याचे आढळून आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.