कोल्हापूर ः महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी गांधी मैदान येथे झालेल्या सभेत उमेदवारांसह उपस्थितांना हात उंचावून अभिवादन करताना अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी. डावीकडून उमेदवार राजेश लाटकर, राहुल पाटील, खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, गणपतराव पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. राजू आवळे. (छाया ः मिलन मकानदार)
Published on
:
17 Nov 2024, 1:38 am
Updated on
:
17 Nov 2024, 1:38 am
कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असून त्यासाठी महाविकास आघाडीला सत्ता द्या. राज्यातील तरुणांना अडीच लाख नोकर्या देऊ, महिलांना दरमहा तीन हजार रुपये, जातनिहाय जनगणना करण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करा, असे आवाहन अ. भा. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांंधी यांनी आज केले.
भाजपचे वागणे आणि कृती यात खूप फरक आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यायचे आणि त्यांचाच मुलगा उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसायचा, संविधानाचे नाव घ्यायचे आणि संविधानावर आधारित स्थापन झालेले सरकार फोडाफोडी करून चोरायचे, भ—ष्टाचार रोखण्याची भाषा करायची आणि सत्तेसाठी आमदार, खासदारांची खरेदी-विक्री करायची, जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर काही बोलायचे नाही आणि निवडणुका आल्या की जात आणि धर्माच्या नावावर मते मागायची, असा कार्यक्रम भाजप महायुतीकडून सुरू आहे. त्यांना रोखण्याची जबाबदारी देशाला दिशा दाखविणार्या महाराष्ट्रावर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे. खोटे बोलणार्या या सरकारला स्वाभिमानी महाराष्ट्राने सत्तेपासून दूर ठेवावे, असेही त्या म्हणाल्या.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी गांधी मैदानात आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेत प्रियांका बोलत होत्या. प्रियांका गांधी प्रथमच कोल्हापुरात येणार असल्यामुळे त्यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. साधू-संतांची समतेची परंपरा आणि छत्रपती शिवरायांच्या पवित्र महाराष्ट्राच्या भूमीने नेहमीच संपूर्ण देशाला दिशा दाखविण्याचे काम केले आहे. स्वातंत्र्यलढा पुढे नेण्यामध्ये महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. अनेक क्रांतिवीरांनी आपले बलिदान दिले आहे, असे सांगून प्रियांका म्हणाल्या, सरकारकडून चांगल्या कामांची, खरे बोलण्याची आपण अपेक्षा करतो. परंतु तसे काहीच दिसत नाही. जे बोलले जाते नेमके त्याच्या उलटे चित्र पाहावयास मिळते. जनतेने त्यांच्यावर दाखविलेला विश्वास ते सार्थ करताना दिसत नाही. महाराष्ट्राचा सरकारकडून अपमान केला जात आहे. त्यामुळे निराशा होते. छत्रपती शिवरायांचा पुतळा महाराष्ट्रात पडला, या पुतळ्याच्या कामात भ—ष्टाचार करून महायुतीने छत्रपती शिवरायांचा अपमान केला आहे. संसदेतून एक पुतळा हटविला, बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यायचे आणि शिवरायांच्या एकाही पुतळ्याचे काम पूर्ण करायचे नाही, ही भाजपच्या कामाची पद्धत आहे. छत्रपती शिवरायांचे विचार रोज महायुतीकडून संपवले जात आहेत.
10 वर्षांत शेतकर्यांसाठी काहीच केले नाही
प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या, शेतकरी त्रस्त आहे. दूध उत्पादकांना दर मिळत नाही. उसाला योग्य भाव मिळत नाही, शेतीत काबाडकष्ट करूनही पैसे मिळत नाहीत. शेतीला लागणार्या प्रत्येक गोष्टीला कर द्यावा लागतो. सरकारकडून शेतेकर्यांना कोणतीही मदत मिळत नाही. शेतकरी कर्जबाजारी होत आहे. त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. भाजपचे नेते शेतकर्यांच्या विषयी व्यासपीठावरून बोलतात. परंतु केंद्रात दहा वर्षे त्यांची सत्ता आहे. त्यांनी शेतकर्यांसाठी काहीच केले नाही, असे सांगत प्रियांका गांधी म्हणाल्या, यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप नेते कोणत्या तोंडाने शेतकर्यांची संवाद साधतात.
लोकसभा पराभवानंतर बहीण लाडकी झाली
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपयश आल्यानंतर महायुतीला लाडक्या बहीण योजनेची आठवण झाली. त्यापूर्वी अडीच वर्षे राज्यात आणि दहा वर्षे केंद्रात सरकार असताना तुम्ही काय करत होता? तेव्हा ही योजना का सुरू केली नाही? आमचे सरकार असलेल्या राज्यामंध्ये काँग्रेसने ही योजना सुरू करून महिलांना हातभार लावण्यात आला आहे. तर मध्य प्रदेशमध्ये भाजपने सुरू केलेली ही योजना बंद केली.
महागाई प्रचंड वाढली आहे. लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. मुलांना शिक्षण कसे द्यायचे, त्यांची फी कशी भरायची, फीसाठी कर्ज काढावे लागते, दिवस-रात्र काबाडकष्ट करूनही महागाईचा सामना करता येईना झाला आहे. कुटुंबातील अनेक सदस्यांनी काम करूनही महागाईपुढे त्यांना हार मानावी लागली आहे. उपचाराची स्थितीही अशीच आहे. महागाई, बेरोजगारी, शिक्षण, महिलांचा सन्मान आदी प्रश्नांबाबत त्यांच्याकडे कोणतेही उत्तरदायित्व नाही. या गोष्टी फक्त ते व्यासपीठावरून बोलतात आणि सोडून देतात. जनतेला कोणतीही उत्तरे देत नाहीत.
उद्योग गुजरातला, बेरोजगारी महाराष्ट्रात
प्रियांका गांधी म्हणाल्या, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात येत आहेत. लहान, मध्यम स्वरूपाचे व्यवसाय बंद पडू लागले आहेत. आतापर्यंत 6 हजार उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देश उद्योगपतींच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे. सरकारी मालमत्तेची विक्री करताना त्यांना काही वाटत नाही. परंतु यावर भाजप सरकार काही बोलत नाही, असे सांगून त्या म्हणाल्या, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यावर बोलण्याची त्यांना गरज वाटत नाही. आपण त्यांना यासंदर्भात कधी विचारत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक सुरू असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौर्यावर गेले. किमान निवडणूक होईपर्यंत त्यांनी थांबावयास हवे होते. परंतु त्यांना जनतेशी काही देणे-घेणे नाही. निवडणुकीत ते अशा प्रश्नांवर कधीही चर्चा करत नाहीत. निवडणुका आल्या की त्यांना जात, धर्म आठवतो. जाती, धर्माच्या नावावर मते मागण्याचा ते प्रयत्न करतात. आतापर्यंत पंतप्रधान मोदी यांनी बोलल्याप्रमाणे कधीही कृती केली नाही. बोलतात एक आणि करतात एक. मोदी एकच वाक्य खरे बोलले आहेत. ते म्हणजे ‘सत्य सामने आ जायेगा’. आपलेसुद्धा हेच म्हणणे आहे. एक दिवस सत्य समाजासमोर येणार आहे.
काँग्रेस आश्वासने पूर्ण करते. महाराष्ट्रात आमचे सरकार आल्यास महिलांच्या भविष्यासाठी 3 हजार रुपये दरमहा दिले जातील. जातवार जनगणना करणार असून आरक्षणाची मर्यादा 50 टक्यांवर नेणार. 25 लाखाचा आरोग्य विभाग उतरविणार. महाराष्ट्रातील 2 लाख 50 हजार रिक्त पदे भरणार. बेरोजगार युवकांना 4 हजार रुपये भत्ता देणार ही काँग्रेसची गॅरंटी आहे. मुलांचे भविष्य अधिक मजबूत करण्यासाठी, महिलांना सक्षम करण्यासाठी, बेरोजगारी कमी करण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या, असे आवाहनही प्रियांका गांधी यांनी केले.
शिवरायांचा महाराष्ट्र गुजरातपुढे झुकणार नाही ः विश्वजित कदम
कितीही संकटे येऊद्या, आव्हाने येऊद्या, ती पेलण्याची ताकद आमच्यात आहे. छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र गुजरातपुढे कदापि झुकणार नाही, असे सांगून विश्वजित कदम म्हणाले, कोल्हापुरात ठिणगी पडली की, त्याचा वणवा महाराष्ट्रभर पसरतो. लोकसभा निवडणुकीत हे आपण पाहिले आहे. शाहू महाराज यांचा विजय कोल्हापुरातून झाला आणि बघता बघता महाविकास आघाडीला महाराष्ट्रभर यश आले. ही शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांची नगरी आहे. कोल्हापुरात हे विचार रुजले आहेत. म्हणून तर महायुतीचे मोठे नेते नेहमी कोल्हापुरात येऊन या समतेच्या विचारांना आव्हान देत आहेत. महाविकास आघाडीचे नेते सतेज पाटील या आव्हानांना तोड देण्यास खंबीर आहेत. कारण सतेज पाटील आता महाराष्ट्राचे नेते आहेत.
महाराष्ट्र धर्म वाचविण्यासाठी लढा ः सतेज पाटील
अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदुत्व, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुरोगामी विचार घेऊन महाविकास आघाडी महाराष्ट्र धर्म वाढविण्याचे काम करत आहेत. ही निवडणूक महाराष्ट्रासाठी स्वाभिमानाची अस्मितेची असून एकात्मतेसाठी लढली जात आहे. महायुतीने कितीही राजकीय पक्षांची फोडाफोडी केली तरी समोरचा हा जनसमुदाय निष्ठावंत आहे. त्यांच्यामुळेच महाराष्ट्र धर्मासाठी लढण्याचे बळ आम्हाला मिळत असल्याचे आ. सतेज पाटील यांनी सांगितले.
सध्या राज्यात महागाईने कंबरडे मोडले आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेले जात आहेत. महाराष्ट्रात शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. या पापाचे धनी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार हे आहेत. त्यामुळे जनता या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवेल. महाविकास आघाडीचे सरकार येताच कोल्हापूर, सांगली, सातारा येथे इंडस्ट्रियल हब करण्याचे आश्वासनही सतेज पाटील यांनी यावेळी दिले.
महायुतीने महाराष्ट्राची संस्कृती धुळीस मिळवली ः शाहू महाराज
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या या महाराष्ट्रात महायुतीने जाती धर्मात विष कालवण्याचे काम केले असून सत्तेसाठी महाराष्ट्राची संस्कृती धुळीस मिळविण्याचे काम केले आहे. देशात एकप्रकारे भाजपने एकाधिकारशाही सुरू केली असून जनता या एकाधिकारशाहीला कंटाळली आहे. सत्ता मिळविण्यासाठी काहीही केले जात आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेचा कौल भाजपच्या विरोधात आहे. परंतु काहीही करून सत्ता मिळवायचीच असा त्यांचा फंडा आहे. ईडी, सीबीआयची भीती दाखवून राजकीय पक्ष आणि नेत्यांना धमकावले आहे. भाजपने जनतेचा विश्वासघात केला असल्याचा आरोप खासदार शाहू महाराज यांनी केला.
यावेळी कर्नाटकच्या माजी आमदार अंजली निंबाळकर, महाविकास आघाडीचे उमेदवार आ. ऋतुराज पाटील, राजू आवळे, राहुल पाटील, राजू लाटकर, के. पी. पाटील, ऑलिम्पिकवीर बजरंग पुनिया, शिवसेनेचे विजय देवणे, उपनेते संजय पवार, चंद्रकांत यादव, भारती पोवार, संदीप देसाई, आर. के. पोवार, शिवाजीराव परुळेकर, सतीशचंद्र कांबळे, अतुल दिघे, दगडू भास्कर यांची भाषणे झाली. सभेला आमदार जयंत आसगावकर, माजी आ. मालोजीराजे, मधुरिमाराजे, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, दिलीप पवार आदी उपस्थित होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी आभार मानले.
प्रियांका गांधी यांच्याकडून ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी व्यासपाठीवरून भाषणाला सुरुवात करण्यापूर्वीच ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा दिला. त्यांनी दिलेल्या या घोषणेमुळे उपस्थितांनीही त्यांना प्रतिसाद दिला.