दातेंसाठी अजित पवारांची भाळवणीत आज सभा:पारनेर मतदारसंघात चमत्कार घडण्याचे दाते यांचे सुतोवाच
2 hours ago
1
महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्या प्रचारासाठी भाळवणी येथे रविवारी (१७ ऑक्टोबर) सकाळी साडेनऊ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सभा होत आहे. या सभेत काही अपक्ष उमेदवार महायुतीला पाठिंबा देणार असल्याचे सुतोवाच करतानाच निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पारनेर-नगर मतदारसंघात चमत्कार घडेल, असा दावा काशिनाथ दाते यांनी केला असल्याने नेमका काय चमत्कार घडणार आणि कोणते अपक्ष उमेदवार दाते यांना पाठिंबा देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी खा. सुजय विखे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सभेत अजित पवार यांच्यासह विखे पिता-पुत्र, कर्डिले हे खासदार नीलेश लंके यांच्यावर काय तोफा डागतात, याकडेही मतदारसंघाचे लक्ष लागले. एक महिन्यापूर्वी, १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या सभेत अजित पवारांनी खासदार लंके यांच्यावर घणाघाती टीका केली होती. खासदार आणि आमदार ही दोन्ही पदे एकाच घरात गेली, तर पारनेरच्या जनतेला कोणी वाली राहणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला होता. आपण पारनेरच्या जनतेला सावध करायला आलो असल्याचेही पवार म्हणाले होते. त्यामुळे रविवारच्या सभेत पवार, लंकेंविरोधात काय बोलणार याबाबत सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे. महाविकास आघाडीच्या शिर्डी मतदारसंघाच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारसभेत खासदार लंके यांनी विखे-पिता पुत्रांना त्यांच्या होम ग्राऊंडवर जात डिवचले. त्याची प्रतिक्रिया भाळवणी येथील प्रचारसभेत उमटल्याशिवाय राहणार नाही. दाते, महाविकास आघाडीच्या राणी लंके तसेच माजी आमदार विजय औटी, माजी जि. प. सदस्य संदेश कार्ले, माजी नगराध्यक्ष विजय औटी या अपक्ष उमेदवारांमुळे पंचरंगी झालेल्या निवडणुकीत अखेरच्या चार दिवसात चांगलाच रंग भरला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)