Maharashtra Assembly Polls | डिलाईल रोड येथून कोल्हापूरसाठी सव्वाशे गाड्याfile photo
Published on
:
17 Nov 2024, 5:24 am
Updated on
:
17 Nov 2024, 5:24 am
मुंबई : Maharashtra Assembly Polls | मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरून (डिलाईल रोड) येत्या १९ तारखेला सुमारे सव्वाशे खासगी बस कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. याशिवाय येथून एसटीच्या नियमीत गाड्या आहेत त्या वेगळ्याच. २० तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या मतदानासाठी मुंबईत राहणाऱ्या कोल्हापूरच्या मतदारांसाठी तेथील उमेदवारांनी नेण्या-आणण्याची चोख व्यवस्था केली आहे. मतदारांच्या मनधरणीसाठी गावोगावचे पुढारी कामाला लागले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो रहिवासी मुंबईतील ना. म. जोशी मार्ग, परळ, घाटकोपर, विक्रोळी, मानखुर्द या विभागांमध्ये वास्तव्यास आहेत. लोकसभा अथवा विधानसभेची निवडणूक जाहीर झाली की, चंदगड, आजरा आणि शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातील उमेदवार थेट मुंबईला धाव घेतात. या परिसरातील मतदारांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मतदानादिवशी हे कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने मतदारसंघात उपस्थित राहतील याची काळजी घेतात. याहीवेळी असेच चित्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे एक ते दीड लाखांपेक्षा अधिक मतदार मुंबईत विविध ठिकाणी आहेत. यापैकी अद्यापही गावी मतदार यादीत नावे असलेले ५० हजारांपेक्षा अधिक मतदार डिलाईल रोड परिसरात आहेत. त्यामुळे कागल मतदारसंघातील समरजित घाटगे, हसन मुश्रीफ या उमेदवारांकडून, तर शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातील विनय कोरे, सत्यजित पाटील या उमेदवारांकडून मुंबईत डिलाईल रोड परिसरात भव्य मेळावे आयोजित करून मतदारांना मतदानासाठी येण्याचे आवाहन केले जात आहे.
मुंबईतील कार्यकर्त्यांवर जबाबदारी
मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांमार्फत खासगी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. वास्तविक, निवडणुकीवेळी गाड्यांची व्यवस्था उमेदवारांकडून केली जाते. मात्र, यावेळी उमेदवारांनी प्रत्येक गावच्या मुंबईतील कार्यकर्त्यांवर ही जबाबदारी सोपविली आहे. या कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातील मतदारांची यादी करून बसेस बुक केल्या आहेत. आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी यावेळी मतदारांना गावाला घेऊन जायचेच, असा निर्धार त्यांनी केला आहे.
ना. म. जोशी मार्गावरून शाहूवाडी, आजरा, चंदगड आदी भागात दररोज २० खासगी बसेस सुटतात. सर्व गाड्या कार्यकर्त्यांनी १९ तारखेसाठी बुक केल्या आहेत. याशिवाय अन्य खासगी बसेस आणि स्कूल बसेस मिळून १२५ गाड्या बुक झाल्या आहेत. ट्रॅव्हल्सनी बसचे भाडेही ७०० रुपयांवरून एक हजार रुपये केले आहे. मात्र, कार्यकर्त्यांनी सरसकट ६० हजार रुपयांना प्रत्येक बस बुक केली आहे. मतदारांना मुंबईतून घेऊन जाण्याची आणि परत आणून सोडण्याची जबाबदारी बसगाड्यांवर सोपविली आहे असे एका ट्रॅव्हल बुकिंग एजंटने सांगितले