नाशिक : गंगापूर गावामध्ये आयोजित प्रचारसभेत मतदारांशी संवाद साधताना सुधाकर बडगुजर.Pudhari
Published on
:
17 Nov 2024, 5:22 am
Updated on
:
17 Nov 2024, 5:22 am
नाशिक : गंगापूर परिसर हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला असून, या परिसरातून सुधाकर बडगुजर यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देऊ, असा विश्वास पक्षाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी व्यक्त केला.
नाशिक पश्चिम मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारार्थ गंगापूर गावामध्ये आयोजित चौकसभेत ते बोलत होते. व्यासपीठावर बडगुजर होते. शिंदे म्हणाले की, नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या विद्यमान आमदारांनी गंगापूर परिसराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने या परिसराचा विकास खुंटला आहे. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. लोकवस्ती वाढत आहे परंतु त्या तुलनेने या परिसरात पाण्याचा प्रश्न बिकट आहे. हे सर्व प्रश्न सोडवायचे असतील, तर बडगुजर यांच्यासारखा अभ्यासू नेता विधानसभेत जाणे गरजेचे असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
विद्यमान आमदारांनी गेल्या 10 वर्षांत या मतदारसंघाचा अक्षरशः बट्ट्याबोळ केला. मतदारसंघात अंबड आणि सातपूर या दोन औद्योगिक वसाहती असूनही रोजगारनिर्मितीला चालना नसल्याने बेरोजगारीचा प्रश्न बिकट झाला. अनेक कारखाने बंद पडले. मात्र ते सुरू करण्यासाठी विद्यमान आमदारांनी कोणतीच पावले उचलली नाहीत. उलट औद्योगिक विकासाला त्यांनी खीळ घातल्याने उद्योजक, कामगारांचा रोष त्यांनी ओढवून घेतला आहे. मी निवडून आल्यास कामगारांना तसेच उद्योजकांना न्याय मिळवून देईन. आयटी पार्क, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी आपण आपले सर्व कसब पणास लावू. गंगापूरसह नाशिक पश्चिम मतदारसंघ भयमुक्त करू, असे बडगुजर यांनी सांगितले.
याप्रसंगी संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, विष्णुपंत बेंडकुळे, गोकुळ पाटील, मुरलीधर पाटील, विजय शिंदे, रमेश देशमाने, दत्तात्रय घोलप, शिवाजी उगले, सुनील घोलप आदी उपस्थित होते.