Published on
:
17 Nov 2024, 5:12 am
Updated on
:
17 Nov 2024, 5:12 am
रायगड जिल्ह्यात पनवेल, कर्जत, उरण, पेण,अलिबाग,श्रीवर्धन आणि महाड असे सात मतदार संघ असून त्यांतील कर्जत, अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड या चार मतदार संघात महिला मतदारांची संख्या पूरष मतदारांपेक्षा अधिक आहे. रायगडमधील या सात विधानसभा मतदार संघात एकूण मतदार संख्या 24 लाख 88 हजार 788 असून या मध्ये पूरुष मतदार 12 लाख 59 हजार 567 तर महिला मतदार 12 लाख 29 हजार 130 आहेत. तर तृतीयपंथी मतदार 91 आहेत.
गेल्या विस पंचवीस वर्षांपूर्वी राजकारण हा विषय आपला नाही अशी काहीशी भावना महिलांमध्ये दिसून येत असे, त्यावेळी या विषयावर त्या मोकळेपणाने बोलायला देखील तयार नसायच्या. पंरतू आता असे एकही क्षेत्र नाही की जेथे महिलांचा सहभाग नाही. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालीका, नगरपरिषदा, महानगरपालिका, पासून अगदी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूकांमध्ये महिलांना आरक्षण मिळाल्याने महिलांमधे जागरुकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोकशाहीच्या सक्षमतेकरीता आमचीही जबाबदारी मोठी आहे हा विचार आता महिलांमध्ये रुजला असून, त्यांतूनच आपण आपला मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आणि त्याकरिता आपली मतदार नोंदणी असणे महत्वाचे असल्याचे लक्षात घेऊन महिलांना मतदार नोंदणी मोहिमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. त्यातूनच रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघांपैकी चार विधानसभा मतदार संघात महिला मतदारांची संख्या पूरुष मतदारांपेक्षा अधिक असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
समाजकारण, अर्थकारण, प्रशासकीय सेवा, पोलीस सेवा, संरक्षण दले या विविध क्षेत्रांबरोबरच राजकारणात देखील महिला मागे राहीलेल्या नाहीत. या सर्व क्षेत्रात महिला उच्च पदावर विराजमान झाल्या आहेत आणि त्याचा अभिमान आज समाजातील सर्वथरातील महिलांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळेच आता राजकारणातही महिलांना रुची वाढल्याचे दिसून येत आहे. लोकशाहीमध्ये महिलांना संधी प्राप्त झाल्याने, या संधीचे सोन करण्याची मानसिकता महिलांमध्ये दिसून येते आणि त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न देखील दिसून येत आहेत. लोकशाही मध्ये मतदार हाच राज असतो त्यामुळे सर्व प्रथम आपली मतदार म्हणून नोंदणी अनिवार्य असल्याची भावना अनेक महिला मतदारांशी बोलताना जाणऊन आली.
महीला मतदार संख्या पूरुषांपेक्षा अधिक असलेल्या श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाची एकूण मतदार संख्या 2लाख 65 हजार 286 आहे. त्यात पुरुष मतदार 1 लाख 29 हजार 918 आहेत तर महिला मतदारांची संख्या 5 हजार 450 ने अधिक म्हणजे 1 लाख 35 हजार 368 आहे. दरम्यान या विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजिश्रत पवार गटाच्या आदिती तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाचे अनिल नवगणे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या मतदार संघातील महिला मतदारांची अधिक असलेली संख्या विचारात घेता येथे महिला मतदार निर्णायक ठरणार असे दिसून येत आहे.
अलिबाग विधानसभा मतदार संघात देखील महिला मतदारांचे प्रमाण पुरुष मतदारांपेक्षा 5 हजार 143ने अधिक आहे. या मतदार संघात एकूण मतदार 3 लाख 6 हजार 230 असून त्यात पूरुष मतदार 1 लाख 50 हजार 543 आहेत तर महिला मतदार 5 हजार 143 ने अधिक म्हणजे 1 लाख 55 हजार 686 आहेत. अलिबाग विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार शिवसेना-शिंदे गटाचे महेद्र दळवी, शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा नृपाल पाटील आणि भाजपा बंडखोप अपक्ष उमेदवार दिलीप भोईर अशी लढत आहे. या मतदार संघात महिला मतदारांची अधिक असलेली संख्या विचारात घेता येथे देखील महिला मतदार निर्णायक ठरणार आहेत.
महाड विधानसभा मतदार संघात महिला मतदारांची संख्या पूरुष मतदारांपेक्षा 1 हजार 940 ने अधिक आहे. या मतदार संघात एकुण मतदार 2 लाख 96 हजार 388 मतदार आहेत. त्यात पूरुष मतदार 1 लाख 47 हजार 224 आहेत तर महिला मतदार 1 हजार 940 ने अधिक म्हणजे 1 लाख 49 हजार 164 आहेत.
महाड विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार शिवसेना-शिंदे गटाचे भरत गोगावले आणि शिवसेना-ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांच्यात दुरंगी लढत होत आहे. महिला मतदारांची संख्या अधिक असल्याने त्यांचे मतदान निर्णायक ठरु शकणार आहे.
कर्जत विधानसभा मतदार संघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या 153 ने अधिक आहे. कर्जत विधानसभा मतदार संघात एकूण मतदार 3 लाख 18 हजार 742 असून त्यात पुरुष मतदार 1 लाख 59 हजार 293 आहेत. तर महिला मतदारांची संख्या 153 ने अधिक म्हणजे 1 लाख 59 हजार 446 आहे.