Published on
:
17 Nov 2024, 5:21 am
Updated on
:
17 Nov 2024, 5:21 am
ठाणे : महायुतीचा बालेकिल्ला असलेला ठाणे जिल्हा पुन्हा एकदा राखण्यासाठी भाजप- शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडविला असून केंद्रीय मंत्री तसेच इतर राज्यातील खासदार, आमदार मंत्री यांची फौज मैदानात उतरविली आहे. रविवारी (दि.17) रोजी ठाण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तोफ धडाडणार असून ते शहरांच्या विकासाचे काय व्हिजन सांगतात आणि विरोधकांवर कसे आसूड ओढतात, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
ठाणे विधानसभेचे भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पी. नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, नेत्यांनी प्रचार करीत मतदारांना महायुतीला विजय करण्याचे आवाहन केले. उद्या भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची गावदेवी मैदानावर सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेत भाजपाचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संजय केळकर यांच्यासह कोपरी-पाचपाखाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ओवळा-माजिवडा मतदारसंघातील प्रताप सरनाईक, मुंब्रा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या प्रचारासाठी मतदारांना आवाहन करणार आहेत, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली. या सभेला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेनेचे शहरप्रमुख हेमंत पवार, आरपीआयचे शहराध्यक्ष भास्कर वाघमारे, यांच्यासह मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिकांबरोबरच महायुतीचे कार्यकर्तेही उपस्थित राहतील. या सभेसाठी महायुतीकडून सध्या जोरदार तयारी सुरू आहे.