Published on
:
17 Nov 2024, 1:37 am
जयसिंगपूर : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून चांगले काम केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठ्या विश्वासाने ताकद दिली होती. या निवडणुकीत त्यांना प्रचंड मताने विजयी करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांना निश्चित ताकद देतील, असा मुख्यमंत्री साहेबांचा संदेश मी घेऊन आलो आहे, त्यामुळे त्यांना सर्वाधिक मताने विजयी करावे, असे आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले.
महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रचारार्थ शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आयोजित सभेत ते बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यड्रावकर यांना 1903 कोटींचा विकास निधी दिला. यड्रावकर यांनी पै-पैचा हिशेब आपल्या आमदारकीच्या विकासपर्व या प्रगती पुस्तकात दिला आहे. महापूर काळात यड्रावकरांनी पूरग्रस्तांच्या हिताचे काम करून त्याना दिलासा दिला. आमदार यड्रावकर म्हणाले, लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवून शासनाच्या योजना तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. शिरोळसाठी 100 कोटी 62 लाखांचा निधी आणला आहे. पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराज याचा पुतळा आणि सीनिअर कॉलेज सुरू करणार आहे.
यावेळी खासदार धैर्यशील माने, योगेश खाडे, मल्लाप्पा चौगुले, रणजित पाटील, मनीषा डांगे, बबन यादव, दशरथ काळे, अमरसिंह पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उबाठाचे कृष्णात भेंडे, आकाश गायकवाड, अर्चना बिरणगे यांनी उबाठातून शिंदे गटात जाहीर प्रवेश केला; तर जैनापूर येथील कोळी बांधवांनी राजर्षी शाहू विकास आघाडीत प्रवेश केला. तसेच अर्जुनवाड येथील झांबरे ग्रुप, नंदकुमार पाटील, सावकर चौगुले यांनी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पाठिंबा दिला. यासह दानोळी येथील स्वाभिमानी संघटनेच्या असंख्य पदाधिकार्यांनी यड्रावकर यांना पाठिंबा दिला.