Published on
:
30 Nov 2024, 5:36 am
Updated on
:
30 Nov 2024, 5:36 am
श्रीवर्धन तालुक्यात निसर्ग व तौक्ते या दोन चक्रिवादळांत नारळ व रोठा सुपारी झाडांचे अतोनात नुकसान झाले. काही कालावधीनंतर नुकसानग्रस्त बागायतदारांनी आपापल्या वाड्यांमधून रोठा सुपारी व नारळ रोपांची लागवड केली. लागवडी नंतर उत्पादन मिळण्यास किमान चार ते पाच वर्षे इतका कालावधी सुपारी,नारळ या झाडांना लागतो.या कारणास्तव आता श्रीवर्धन येथील बागायतदार कमी कालावधीत वर्षभर उत्पादन व उत्पन्न देणार्या मसाला आंतरपीकाला प्राधान्य देऊ लागले आहेत.
श्रीवर्धन तालुक्यात नैसर्गिक आपत्तीत बागायती फळझाडे समजल्या जाणार्या नारळ व रोठा सुपारीच्या झाडांचे 80 टक्के नुकसान झाले होते.वाड्यांमधुन उन्मळून पडलेल्या माड व पोफळींची जागा स्वच्छ करीत बागायतदारांनी नव्याने माड व सुपारी रोपांची लागवड केली.यावेळी बागायतदारांनी माड,पोफळीच्या मधील मोकळ्या जागेत मिश्रपीकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली.श्रीवर्धन तालुक्यात आज हळद, लवंग, दालचिनी, काळीमिरी, मिरची, जायफळ या आंतरपीकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे.
नारळ व सुपारी झाडांना बारमाही पाण्याच्या जमीनी मानवतात तशाच मसाला पीकाला ही बारमाही जमीन योग्य असल्याने येथील बागायतदार वार्षिक उत्पादन व उत्पन्न देणार्या मसाला पीकाकडे लक्ष केंद्रित करू लागले आहेत. हळद, लवंग, दालचिनी, काळीमिरी, मिरची, जायफळ या मसाला पिकांचे उत्पादन चांगल्या प्रकारे होत आहे.आपल्याच वाडीत मसाला पीक येत असल्याने बागायतदार तालुक्यातील बाजारपेठेत प्रक्रिया करून मसाले विक्रिस पाठवत आहेत तर महिलावर्गासाठी घरगुती मसाला तयार करून विक्री करीता ठेवणे हे एक व्यवसायाचे साधन उपलब्ध झाले आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील नारळ व पोफळीच्या वाड्यांमध्ये हळदीचे क्षेत्र 30.11 हेक्टर ,लवंग क्षेत्र 11हेक्टर ,दालचिनी क्षेत्र 28.37हेक्टर ,काळिमिरी 24.55 हेक्टर ,मिरची 36.89हेक्टर व जायफळाचे क्षेत्र 29.87 हेक्टर आहे.माड व पोफळींना खत पाणी देत असताना आंतरपीकांना जास्त मात्रेत खत पाणी द्यावे लागते.याचा फायदा असा होतो की माड,सुपारीच्या वाढीवर आणि उत्पादनात चाळीस ते साठ टक्क्यांनी वाढ होते.श्रीवर्धन तालुक्यातील अनेक बागायतदार वाडीतील बागायती फळझाडांना सोडण्यात येत असलेल्या पाण्याच्या अपव्यय न होऊन देता दोन झाडांमध्ये मोकळ्या जागेत आंतरपिकांची लागवड करीत उत्पादन घेत आहेत.
हळद-कंद लागवडी नंतर नऊ ते दहा महिन्यानी उत्पादन.हळदीची पाने पिवळी पडून सुकायला लागल्यावर जमीनीतील कंदाची काढणी.
लवंग-लागवडी नंतर तीन वर्षांनी झाडास कळी धारणा.कळीच्या घुमटाची पुर्ण वाढ झाल्यावर साधारण हंगामास सुरूवात एप्रिल ते मे महिन्या दरम्यान.
दालचिनी-लागवडी नंतर तीन वर्षांनी पहिल्या सालीची काढणी.जुन ते जुलै महिन्यात हंगामास सुरूवात.
काळीमिरी-लागवडी नंतर अडीच वर्षांनी फळे धरू लागतात.मार्च ते एप्रिल दरम्यान काढणीस योग्य.
मिरची-लागवडी नंतर आठ ते दहा महिन्यात उत्पादन.हंगाम बारा महिने.
जायफळ-लागवड केल्यापासून चार वर्षांनी उत्पादन.जायफळ व जायपत्री हंगामास जुन ते जुलै महिना.