अमरावती (Amravati) :- शालेय विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि स्वावलंबनाची भावना रुजवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या गर्ल्स हायस्कूल मधिल ‘स्टुडंट्स मार्ट’ या अभिनव उपक्रमाला महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री (Minister of Education) मा. श्री. दादाजी भुसे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली आणि या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
उपक्रमाचे विशेष कौतुक
या भेटीदरम्यान शिक्षणमंत्र्यांनी “काल किती व्यवहार झाले ते दाखवा?” थेट अशी विचारणा करत विद्यार्थिनींना त्यांच्या आर्थिक व्यवहाराविषयी तपशील विचारला. विद्यार्थिनींनी उत्साहाने आपल्या विक्रीचा हिशोब सादर केला आणि स्टुडंट्स मार्टमधून त्यांना मिळणाऱ्या व्यवसायिक शिक्षणाविषयी माहिती दिली. यावेळी मंत्री महोदयांनी उत्पादनांची विक्री करून दाखवली तसेच स्टुडंट्स मार्ट चे दैनंदिन व्यवहार कश्या पद्धतीने पार पाडले जातात हे विद्यार्थिनींशी संवाद साधून समजून घेतले. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करत आहेत, ज्यामधून भविष्यात ते अधिक आत्मनिर्भर होतील. स्टुडंट्स मार्ट उपक्रमामुळे विद्यार्थी उद्योजकतेकडे वळत असून, हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरू शकतो.
विद्यार्थ्यांनीही आपले अनुभव आणि या उपक्रमामुळे आलेले बदल याविषयी उत्साहाने सांगितले
ह्या उपक्रमाची संकल्पना प्रभावीपणे राबविणारे शाळेचे व्यवसाय शिक्षक मंगेश मानकर यांचे कडून मंत्री महोदयांनी उपक्रमाची सविस्तर माहिती घेतली. विद्यार्थ्यांनीही आपले अनुभव आणि या उपक्रमामुळे आलेले बदल याविषयी उत्साहाने सांगितले. स्टुडंट्स मार्ट या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवसाय व्यवस्थापन, आर्थिक साक्षरता आणि ग्राहक व्यवहार यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे. मंत्री महोदयांनी या उपक्रमाचे भविष्यात अधिक व्यापक प्रमाणावर विस्तार होईल, अशी ग्वाही दिली. ही भेट आणि संवाद विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, मंगेश मानकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम आणखी प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.