Published on
:
08 Feb 2025, 6:27 am
Updated on
:
08 Feb 2025, 6:27 am
श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धन तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा विखे यांनी तालुका आरोग्य विभागाला दिलेले आहेत.याबाबतचे सविस्तर वृत्त दै.पुढारीच्या शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध होताच त्याची तातडीने दखल घेण्यात आली आहे.
श्रीवर्धन तालुक्यात बोगस डॉक्टरांची वाढती संख्या नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे. काही गावांमध्ये लहान क्लिनिक उभारून, काही डॉक्टर कोणतेही रजिस्ट्रेशन न करता अवैधपणे उपचार करत आहेत. हे डॉक्टर नियमांची पायमल्ली करत, उपचार पद्धतीत भीती निर्माण करत आहेत, ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची मोठी शक्यता आहे. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते धवल तवसाळकर यांनी संबंधित सरकारी यंत्रणा आणि अधिकार्यांकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. याबाबत पुढारीने वाचा फोडताच आरोग्य यंत्रणाही खडबडून जागी झाली.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा विखे यांनी तातडीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नारायणकर यांच्याशी संपर्क साधत बोगस डॉक्टरांवर कारवाईचे निर्देश दिलेले आहेत. त्यांनी संबंधित खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
तवसाळकर यांच्या मागणीमुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. संबंधित यंत्रणांकडून लवकरच तपासणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बोगस डॉक्टरांवर कारवाई करून नागरिकांचा विश्वास पुन्हा प्राप्त करणे अत्यंत आवश्यक आहे.जर या समस्येवर लवकर उपाय योजना न केल्यास, स्थानिक आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होईल आणि नागरिकांमध्ये असंतोष वाढू शकतो. त्यामुळे, योग्य तपासणी करून दोषी डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे, अशी आशा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
दोन, तीन गावात बोगस डॉक्टर
धवल तवसाळकर यांच्या अर्जानुसार, श्रीवर्धन तालुक्यातील दोन ते तीन गावांमध्ये बोगस डॉक्टरांची संख्या लक्षणीय वाढली आहे. या डॉक्टरांची उपचार पद्धती योग्य नसल्याने स्थानिक नागरिकांची आरोग्य स्थिती गंभीर होऊ शकते. यावर त्वरित कारवाई होऊन दोषी डॉक्टरांवर कायदेशीर कार्यवाही केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तवसाळकर यांनी गटविकास अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस विभागाला तातडीने या प्रकरणावर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन कडून डॉक्टरांचे प्रमाणपत्र तपासणीसाठी पाठवून त्यावर योग्य कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे दोषी डॉक्टरांना कायदेशीर प्रक्रियेच्या कक्षेत आणणे शक्य होईल.
डॉ.मनिषा विखे, जिल्हा आरोग्य अधिकारी