चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये कोणाची निवड होणार, कोणाची नाही. यावर मागील अनेक दिवसांपूसन क्रीडा प्रेमींमध्ये चर्चा रंगली होती. या सर्व चर्चांना आता पूर्णविराम लागला असून हिंदुस्थानी संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानचा संघ चॅम्पियन होण्यासाठी सज्ज झाला आहे. विजय हजारे करंडकात धावांचा पाऊस पाडणाऱ्या करुण नायरचा संघात समावेश करण्यात येईल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु त्याला संघातून वगळण्यात आल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये करुण नायरने गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे. चौफेर फटकेबाजी करत त्याने आपल्या फलंदाजीची जादू वेळोवेळी दाखवून दिली आहे. विजय हजारे करंडकात सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज आहे. त्याने 8 सामन्यांमधील 7 डावांमध्ये 752 च्या सरासरीने 752 धावा चोपून काढल्या आहेत. यामध्ये 5 शतकांचा समावेश आहे. तसेच मागील 7 डावांमध्ये त्याने 7 वेळा 50 हून अधिका धावा केल्या आहेत. त्यामुळे क्रीडा प्रेमींमध्ये करुण नायरच्या फलंदाजीच जोरदार चर्चा आहे. मागील आठ वर्षांपासून करुण नायर संघातून बाहेर आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची हिंदुस्थानी संघात निवड होईल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु त्याला वगळण्यात आल्याने चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
चॅम्पियन ट्रॉफीसाठी हिंदुस्थानचा संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा.